आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची झरीजामणीला भेट

0
11

यवतमाळ, दि. 8 : मुख्याध्यापकाने मुलीसोबत केलेल्या गैरवर्तनप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा यांनी झरीजामणी येथील आश्रमशाळेला भेट दिली. संबंधित मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. यावेळी अमरावती येथील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीष सरोदे, उपायुक्त तायडे, सहायक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी भुवनेश्वरी उपस्थित होत्या.ही घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी अपर आयुक्त आणि संबंधितांना दिले. आश्रमशाळेतील मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आदिवासी विकास विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यात जीवन कौशल्य विकास प्रशिक्षण, बालसंरक्षण आदी विषयांबाबत आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शाळेतील स्त्री अधिक्षकांची पदे भरण्याची कारवाईसुध्दा करण्यात आली आहे. अशाप्रकारचे गैरवर्तन करणा-यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी सचिव मनिषा वर्मा यांनी शाळेची पाहणी करून विद्यार्थीनींसोबत चर्चा केली.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी.जी.लोंदे यांनी मुलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर पाटन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या आधारावर मुख्याध्यापक लोंदे याला निलंबित करण्यात आले आहे.