प्राथमिक शिक्षकांचे २६ डिसेंबरपासून महाअधिवेशन

0
6

कोल्हापूर दि.२८ः: राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १६ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद दि. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ओरोस (सिंधुदूर्ग) येथे होणार आहे. यात शिक्षकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा, भूमिका ठरणार आहे. या महाअधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शिक्षक सहभागी होतील, अशी माहिती शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरडे म्हणाले, बदल्यांबाबतच्या शासनाच्या कार्यवाही, भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिक्षणाबाबत शासन सर्तक नसल्याचे त्याचा त्रास शिक्षकांना होत आहे. हे थांबविण्यासाठी आणि विविध प्रलंबित प्रश्न, मागण्यांच्या पूर्ततकडे सरकार, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा, समितीची भूमिका निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन होणार आहे.यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी चाललेले उपक्रम व नवीन उपाययोजना यावर परिसंवाद, शिक्षण परिषद होणार आहे. महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत करण्याबाबत विचार विनिमय होणार आहे.यासाठी शिक्षणतज्ज्ञांना निमंत्रित केले. या पत्रकार परिषदेस समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद तौंदकर, शहराध्यक्ष उमेश देसाई, राजेंद्र पाटील, कृष्णा कारंडे, आदी उपस्थित होते.
मागण्या अशा

  1. दि. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
  2.  मोफत गणवेश योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करा.
  3. एमएससीआयटीला मुदतवाढ करा.
  4. दि. २३ आॅक्टोबरचा वरिष्ठ व निवडश्रेणी संबंधीचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करा.