गुणवत्तेसाठी हिरिरीने प्रयत्न करा -सभापती चौधरी

0
13

गुणवंत विद्यार्थी हेच शिक्षकांचे ध्येयस्वप्न असावे – उल्हास नरड

*मोहगाव ( तिल्ली ) केंद्राची सहावी परिषद संपन्न*

गोरेगाव,दि.28ः-प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मूल शाळेत टिकावे अन् शिकावे यासाठी सर्व शाळांनी विविधांगी उपक्रम राबवून अपेक्षित लक्ष्य गाठणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. *’माझी शाळा -माझे केंद्र’* या भावनेने वेळोवेळी गरज भासेल त्या शिक्षकांची मदत घ्या व सर्वांनी केंद्र भावनेने यासाठी पुढाकार घ्यावे असे विचार पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी यांनी व्यक्त केले.तालुक्यातील मोहगाव ( तिल्ली ) केंद्राच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गोरेगावचे सभापती दिलीपभाऊ चौधरी,मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड, प्रमुख अतिथी जि प सदस्य श्रीमती ज्योतीताई वालदे, पं स सदस्य ललिताताई बहेकार उपस्थित होत्या.

शैक्षणिक प्रगतीत मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित संपादन पातळीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या पाल्यांना घडविण्याची जबाबदारी आपणांवर आहे, त्यांच्या आर्थिक व शैक्षणिक दौर्बल्याला कधीही तडा जावू देऊ नका. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या देशाचे वैभव ठरतील यासाठी व गुणवत्तेसाठी हिरिरीने प्रयत्न करा असेही चौधरी म्हणाले.  यावेळी बोलतांना  विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर करून संबोध व संकल्पना समजावून देणे प्रसंगी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अमूर्त संकल्पना मूर्त रुपात प्रत्यक्ष दाखवून सर्वांगिण विकासासह गुणवंत विद्यार्थी तयार करणे हे शिक्षकांचे ध्येयस्वप्न असावे असे मनोगत जि प गोंदियाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्रप्रमुख आर आर अगडे यांनी करून केंद्राचा आढावा सादर केला. केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांनी शाळेचा संक्षिप्त आढावा सादर केला.

ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध सामाजिक स्तरांतील असतात. त्यांना खेळ, क्रीडा, अभ्यास आदी कौशल्यात परिपूर्ण करण्याचे आवाहन सौ वालदे व सौ बहेकार यांनी केले.
यावेळी परिषदेस उपस्थित सर्व पाहुण्यांचे ‘लेकरांच्या कविता’ कवितासंग्रह, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पिपरटोला शाळेचे मुख्याध्यापक डी. यू. बिसेन यांचा ४८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.सूत्रसंचालन मोहगाव ( तिल्ली ) शाळेतील ७ च्या तिजल बहेकार व पौर्णिमा रहांगडाले यांनी संयुक्तपणे केले तर आभारप्रदर्शन अशोक चेपटे यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी सी वाघमारे, पदवीधर शिक्षक अशोक चेपटे, कु एल के ठाकरे, हिवराज धपाडे, तानाजी डावकरे यांनी सहकार्य केले.
परिषदेत केंद्रातील सर्व मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते.