गराडा येथील प्राथमिक शाळेला लावले कुलूप

0
16

गोरेगाव,दि.05 : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी(दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. त्यामुळे पालकांनी रोष व्यक्त करीत पाल्यांना शाळेतच न पाठविण्याचा पावित्रा घेतला आहे.
महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेकांची टिका टिपणी व हालअपेष्टा सहन करुन शाळा उघडून ज्ञानाचे भंडार उघडले. तसेच विद्यार्थ्यांना संस्कारीत केले. मात्र प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी गराडा येथील शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. गराडा हे घनदाट जंगलात वसलेले असून हे गाव कोअर क्षेत्र बफर झोनमध्ये येते. या शाळेत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पहिली, दुसरी व चौथ्या वर्गात एकूण आठ विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिली, दुसरी व तिसऱ्या वर्गात एकूण ११ विद्यार्थी होते.
गराडा प्राथमिक शाळेतील २०१७-१८ या शैक्षणीक वर्षातील ११ विद्यार्थ्याची प्राथमिक शाळा मुंडीपार शाळेत समायोजीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतु मुंडीपार प्राथमिक शाळा गराडावरुन ३ किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी तीन किलोमीटर अंतर पहिली व दुसरीचे विद्यार्थी पायी कसे जातील असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शालेय व्यवस्थापन समिती गराडाने एक ठराव घेवून जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना पत्र देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली होती. मात्र शिक्षण विभागाने शासन आदेशाचे पालन करीत बुधवारी (दि.३) शाळा बंद केली. गराडा शाळेतील शिक्षक आनंद गौपाले व शिक्षीका अनिता तुरकर यांचे मुंडीपार प्राथमिक शाळेत समायोजन करण्यात आले आहे.