‘सक्षम’ हा विद्यार्थी-शिक्षकांच्या अंतर्मनाचा अविष्कार

0
13

भंडारा,दि.05 : वाचन, लिखाण, वक्तृत्व संवाद, स्व:चा विकास, व सामाजिक भान या बाबी प्रचलित अभ्यासक्रमात नाविण्यपूर्ण पद्धतीने मुलांमध्ये बिंबविण्यासाठी सक्षम हा उपक्रम कार्य करणार आहे. सक्षम हा विद्यार्थी व शिक्षकांच्या अंतर्मनाचा अविष्कार ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.जिल्हा प्रशासन व मानव विकास कार्यक्रमच्या सहकार्याने सक्षम हा नाविण्यपूर्ण उपक्रम तयार करण्यात आला. या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारला पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, आ.चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूरच्या नगरसेविका डॉ.परिणीता फुके, शुभांगी गेंढे हे उपस्थित होते.
यावेळी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर म्हणाल्या, सक्षममुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच वाढणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून तयार झालेला सक्षम उपक्रम जिल्हा सक्षम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ.चरण वाघमारे म्हणाले, सक्षम हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून सर्व शाळा व शिक्षकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेची जबाबदारी स्वीकारावी. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले हे व्हिजन वाखणण्याजोगे आहे. गृहपाठ हा सक्षमचा मुळ गाभा आहे. शिक्षक, पालक व समाजाने सक्षमला यशस्वी करण्यासाठी हृदयातून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ.परिणीता फुके यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी म्हणाले, यशदा येथील प्रशिक्षणात कौशल्य आत्मसात करण्यासंबंधी चर्चा झाली. यानंतर जिल्ह्यातील अंगणवाडयांना भेटी दिल्या असता बौध्दीक विकासाचा उपक्रम नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्याद यांच्याशी चर्चा करुन २१ कौशल्य व १० मुल्य यावर काम करण्याचे ठरले. ही संकल्पना जिल्हाधिकारी यांना आवडली आणि त्यांच्या पुढाकाराने सक्षमची निर्मिती झाल्याचे सांगितले. आता खराशी शाळेप्रमाणे १३५ शाळा विकसित करण्यात येतील. शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. ई-ग्रंथालय निर्माण केले जातील व या शाळांना सक्षम डिजीटल पब्लीक स्कूल असे नाव दिले जाईल, असे सुर्यवंशी यांनी सांगितले.
या कार्यक्रमात २५ शिक्षकांनी तयार केलेल्या सक्षम कार्यपुस्तिकेचे आणि जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या माझं सरकार या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. संचलन सहनियोजन अधिकारी वसुंधरा फाळके यांनी तर आभारप्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.