सलग चौथ्या वर्षी गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा अभियान

0
93

गोंदिया,दि.१६ः प्रगतशील शाळा, ज्ञानरचना वाद, प्रगत महाराष्ट्र अभियान यासह ‘ई-लर्निग’ वर भर देत शिक्षण विभाग शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही आहे. काही वर्षांत सातत्याने कमी होणारी पटसंख्या पाहता जिल्ह्य़ात शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ अभियानाला सुरूवात केली आहे. या अंतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढविण्याचे आवाहन सध्या जिल्हा परिषद शाळांसमोर आहे.विशेष म्हणजे हा अभियान एकट्या गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील पुणे,नाशिक सह इतर जिल्हा परिषदामध्येही गेल्या दोन वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे.यावर्षी सुध्दा राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदामध्ये या अभियानाला आज 16 मार्चपासून प्रारंभिर सुरवात करण्यात येणार आहे.

गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी १८ मार्च रोजी गोंदिया जिल्हा परिषदेच्या १ हजार ६९ व नगरपरिषदेच्या २२ शाळांमध्ये अंमलबजावणी होणार आहे.जिल्हा परिषदेच्या सुसज्य शाळांमध्ये मंगलमय शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक मुल शिकावे व टिकावे यासाठी शिक्षण विभागातील यंत्रणेमार्फत नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते.सलग तीन वर्ष शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी राहिल्यानंतर यावर्षीही जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ पासून गोंदिया जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाचे फलीत झाले. गुढीपाडवा या एकाच दिवशी जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतले होते. या उपक्रमाला मिळत असलेला व्यापक प्रतिसाद पाहता तो यंदा देखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शिक्षण विभाग यासाठी कामाला लागला आहे. अधिकाधिक विद्यार्थी शाळेत दाखल व्हावेत याकरिता जिल्ह्यातील शाळा  कामाला लागलेल्या आहेत.

उपक्रम सुरु होण्यापुर्वी जिल्ह्यात इयत्ता पहिलीतील प्रवेशिका विद्यार्थी संख्या सत्र २०१४-१५ मध्ये सुमारे ३७००, त्यानंतर  २०१५-१६ मध्ये १०,१२० विद्यार्थी, २०१६-१७ मध्ये ११९५२ विद्यार्थी तर २०१७-१८ या सत्रात सुमारे १३००० विद्यार्थ्यांनी जि.प. शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेला आहे. गुढीपाडवा उपक्रम राबविण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना सजविलेल्या गाडीवर वाजत-गाजत मिरवणूक, लेझीम भजन दिंडीद्वारे शाळेत आणण्यात येणार आहे. उपक्रम अधिक यशस्वी व परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या कल्पकतेने भर घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान याप्रसंगी प्रदीर्घ कार्यक्रम, भाषणे, कंटाळणाऱ्या बाबी टाळून उपकम मनोरंजक बनविण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या यशोगाथा सांगून पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेत सकाळी शिक्षणाची गुढी उभारुन त्याचे महत्व जनसामान्यांना पटवून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सदर उपक्रम यशस्वी राबवून १०० टक्के पटनोंदणी व उत्कृष्ट कार्य करणाºया शाळा व शिक्षकांचा सन्मान शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.
‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमाची सुरुवात गावात प्रवेश दिंडी काढून करण्यात येणार आहे. गावातील जि.प. शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ, भेटवस्तू व गोड पदार्थ देऊन केले जाणार आहे. पाटी-पेन्सील, वही देऊन व गोड पदार्थ देऊन स्वागत केले जाणार असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य़ सभापती रमेश अंबुले यांनी दिली.

गुढीपाडव्याला प्रवेशाची गुढी उभारण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून पालक व नागरिकामध्ये जिल्हा परिषद शाळेचे महत्व कायम टिकून राहण्यासाठीच हा उपक्रम असून पालकासंह सर्व शिक्षक,लोकप्रतिनिधींनी या अभियानात सहकार्य द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.एम.राजा दयानिधी यांनी केले आहे.