गडचांदूर नगर परिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा

0
15

गडचांदूर,-गडचांदूर नगर परिषदेसाठी शुक्रवारला झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस-सेना-भाजपाचा झेंडा फडकला आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून कॉंग्रेसच्या विद्या शुद्धोधन कांबळे यांना मान मिळाला असून, त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शांता मोतेवाड यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.
भाजपा, सेनेच्या मदतीने कॉंग्रेसने विजय मिळविला असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळाले आहे. गडचांदूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ७, कॉंग्रेस ५, भाजपा ३ व शिवसेना २ असे पक्षिय बलाबल असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारडे जड समजण्यात येत होते. ही निवडणूक भाजपाचे आ. संजय धोटे, कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपाला गडचांदुरकरांनी नाकारले असले, तरी ३ नगरसेवक असल्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. पक्षाचा आदेश झुगारून स्थानिक राजकारणात या नगरसेवकांनी कॉंग्रेसला मतदान केल्यामुळे कॉंग्रेसला सत्तेचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेचे नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख सचिन भोयर सुरूवातीपासूनच कॉंग्रेसच्या बाजूने होते.
सचिन भोयर गडचांदूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडूण आले. त्यांनी भाजपाच्या आनंदीबाई मोरे यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. आनंदीबाई मोरे यांनी स्वत:चे मत शिवसेनेच्या सचिन भोयर यांना दिले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आपली मते भाजपच्या आनंदीबाई मोरे यांना दिली. त्यामुळे मोरे यांना ७ मते मिळाली. कॉंग्रेसचे पापय्या पोन्नमवार, सागर ठाकूरवार, विद्या कांबळे, अरूणा बेतावार, रेखा धोटे, भाजपच्या आनंदीबाई मोरे, हरीभाऊ मोरे, मधुकर कोवळे व शिवसेनेचे सचिन भोयर, चंद्रभागा कोरवते आदींनी कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले.
राष्ट्रवादीचा घास हिरावला
सात नगरसेवक निवडून आल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमतासाठी फक्त दोनच नगरसेवकांची गरज होती. भाजपा पूर्णपणे आपल्यासोबत असल्याचे राष्ट्रवादीचे अनेक नेते खाजगीत बोलत होते. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या वेळी भाजपा-सेनेच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसला मतदान केल्यामुळे जास्त नगरसेवक असतानासुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले.
भाजपाच्या नगरसेवकांनी नाकारला आमदाराचा आदेश
कॉंग्रेस-भाजपा प्रतिस्पर्धी आहे. पुढे ग्रामपंचायत निवडणूका असल्यामुळे कॉंग्रेससोबत सत्तेत बसणे योग्य होणार नाही म्हणून आ. ऍड. संजय धोटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसा आदेश त्यांनी आपल्या तिन्ही नगरसेवकांना देऊन निवडणुकीच्या सभागृहापर्यंत सोडले. मात्र, स्थानिक राजकारणात भाजपा व सेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे होते. त्यामुळे आ. धोटे यांच्या आदेशाला झुगारून भाजपाच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसला मतदान करून आ. संजय धोटे यांच्या नेतृत्वाला धक्का दिला आहे.