वैद्यकीय प्रवेशात यावर्षीही ओबीसींना 2 टक्केच आरक्षण

0
17
वैद्यकीय प्रवेशाच्या राष्ट्रीय कोट्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ओबीसींच्या ६ जागा वाढल्या
गेल्यावर्षी ६८ होत्या यावर्षी ७४ केल्या
महाराष्ट्र,मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय कोट्यातून ओबीसी विद्यार्थी नाहीच
खेमेंद्र कटरे,
गोंदिया,दि.19– देशभरातील वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या १५ टक्के राखीव जागांमधील केवळ दोन टक्केच आरक्षण यावर्षीही केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने ओबीसींना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. महाराष्ट्रातील २१ वैद्यकीय महाविद्यालयात तर ओबीसींना आरक्षण देण्यात आलेले नसल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील वैद्यकीय संस्थामध्ये सुध्दा राष्ट्रीय कोटा ठेवण्यात आलेला नाही.गेल्यावर्षी ओबीसींना ६८ जागा देण्यात आल्या होत्या.त्यामध्ये ६ जागांची वाढ करुन फक्त ७४ करण्यात आल्या आहेत.यावरुन केंद्रातील सरकार हे ओबीसीना केंद्रीय पातळीवरील आरक्षणातून सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशातील  वैद्यकीय महाविद्यालयात १५ टक्के राष्ट्रीय कोट्यातील १९ हजार ३२५ जागापैकी ३ हजार ५२१ जागा एमबीबीएसकरीता व २९९ जागा बीडीएसकरीता नीटच्या माध्यमातून आरक्षित करण्यात आले आहे.यामध्ये जम्मू काश्मिर राज्याचा समावेश करण्यात आलेला नाही.२७ टक्के आरक्षणानुसार ओबीसींना ५२१८ जागा,एससी प्रवर्गाला १५ टक्केनुसार २८९९ जागा व एसटी प्रवर्गाला ७.५ टक्केनुसार १४४९ जागा राष्ट्रीय कोट्यात आरक्षित असायला हव्या होत्या. परंतु ओबीसी प्रवर्गाला ५२१८  पैकी केवळ ७४ जागा ओबीसींना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्यामध्ये मध्यप्रदेश,छ्त्तीसगडसह महाराष्ट्रातील एकाही वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश नाही.आरक्षणाचे सर्व निकष व सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ओबीसींसाठी केवळ ७४ जागा आरक्षित ठेवल्या. ओबीसींना नियमाप्रमाणे २७ टक्के आरक्षण असताना दोन टक्क्यांहून कमी आरक्षण ठेवण्यात आले.
राष्ट्रीय कोट्यात ओबीसींना ७४ जागा असलेली वैद्यकीय संस्था
वैद्यकिय प्रवेशासाठी मेडीकल कॉन्सीलच्यावतीने देशभरातील वैद्यकिय महाविद्यालयातील विविध विषयासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रवेश कोटा प्रवर्गनिहाय आरक्षित करण्यात आला आहे.या कोट्याकडे लक्ष दिल्यास ९३ महाविद्यालयात फक्त ७४ जागा ओबीसींना देण्यात आल्या आहेत.त्यामध्ये राष्ट्रीय कोट्यातील प्रवेशासाठी महाराष्ट्र,मध्यप्रदेश,छत्तीसगडसह अन्य राज्यातील एकाही वैद्यकिय महाविद्यालयाचा समावेश नाही.ज्या वैद्यकिय महाविद्यालयात ओबीसींना राष्ट्रीय कोट्यातून आरक्षण देण्यात आले आहे.त्या कॉलेजमध्ये ईएसआयसी जोका कलकत्ता ४, ईएसआयसी मेडीकल कालेज हैद्राबाद ४, डॉ.बी.ए.एस मेडीकल कॉलेज दिल्ली ४,लेडी हार्डीन मेडीकल कॉलेज न्युदिल्ली ८,मौलाना आझाद मेडीकल कॉलेज न्यु दिल्ली १०, एनडीएमसी मेडीकल कॉलेज दिल्ली ३,विद्यापीठ कॉलेज आफ मेडीकल सायंस दिल्ली ५,व्हीएमएमसी एन्ड एसजेएज न्यु दिल्ली ७, ईएसआयसी मेडीकल कॉलेज फरिदाबाद ४, ईएसआय-एमसी एण्ड पीजीआयएमएस बंगलोर ४, ईएसआयसी एमसी गुलबर्गा ४,आरआयएमएस ईम्फाल ४, ईएसआय चेन्नई ४, जीएमसी ईएसआय हॉस्पीटल कोईम्बतूर ५ आणि ईएसआयसी मेडीकल कॉलेज हैद्राबाद येथे ४ जागा ओबीसीसाठी देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील महाविद्यालया राष्ट्रीय कोट्यात ओबीसी शुन्य
महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची आकडेवारी लक्षात घेता ओबीसींना राष्ट्रीय कोट्यात एक टक्काही आरक्षणच देण्यात आलेले नाही. पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये २३ जागा खुल्या प्रवर्गासाठी, ५ एससी, २ जागा एसटीसाठी राखीव आहेत. जुहूमध्ये १७ जागा खुल्या, ३ एससी, २ एसटीसाठी राखीव आहे. सोलापूरमध्ये १७ जागा खुल्या, ३ एससी व २ जागा एसटी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खुल्यासाठी २३, एससी ५ व एसटी २; औरंगाबाद मेडिकल कॉलेज १९ जागा खुल्या, ३ एससी व १ एसटी; मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये २४ जागा खुल्या, ४ एससी, २ एसटी; अकोला येथे १६ खुल्या, ४ एससी, २ एसटी; लातूर १६ जागा खुल्या, ४ एससी, २ एसटी; चंद्रपूर १२ जागा खुल्या, २ एससी, १ एसटी; गोंदिया मेडिकल कॉलेज १२ जागा खुल्या, २ एससी व १ एसटी; नांदेड १२ जागा खुल्या, एससी २, एसटी १; मीरजमध्ये १८ जागा खुल्या, एससी ३, एसटी २; आयजीएमसी नागपूर १६ खुल्या, ४ एससी, २ एसटी; एलटीएम मुंबई १८ खुल्या, ३ एससी,१ एसटी; वर्धा(सेवाग्राम) ३५ खुल्या,७ एससी,४ एसटी ;कोल्हापूर १८ खुल्या, ३ एससी, १ एसटी; ठाणे ६ खुल्या, २ एससी,१ एसटी; सेठ जीएस मुंबई २१ खुल्या,४ एससी,२ एसटी; धुळे १२ खुल्या,१ एसटी,२ एससी, यवतमाळ १८ खुल्या,३ एससी,१ एसटी; अंबेजोगाई ११ खुल्या,३ एससी,१ एसटी; टीएनएमसी मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये १५ खुल्या, २ एससी तर १ जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नियम काय?
ओबीसी : २७ टक्के
एससी : १५ टक्के
एसटी : ७.५ टक्के