मेडिकल कॉलेजची निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात

0
12

चंद्रपूर,दि.06ः- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकरिता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.या कामासाठी सुमारे सात-आठ महिने पूर्वी निविदा प्रकाशित करून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यानंतर ई निविदा पद्धतीने आलेल्या निविदा उघडण्यात येऊन त्यामध्ये सगळ्यात कमी दराच्या निविदा सुद्धा काढण्याचे काम करण्यात आले. हे करत असताना काही विशिष्ट कंत्राटदारांना निविदा मिळाली म्हणून सत्ताधारी पक्षाचे काही स्थानिक कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी संगनमत करून निविदा प्रक्रियेमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मेडिकल कॉलेजची निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.
या गोष्टीची कुणकुण लागताच नगरसेवक पप्पू देशमुख यांनी निविदा प्रक्रियेवर नियमबाह्य पध्दतीने बोट ठेवले व तशी लेखी तक्रार सुध्दा केली.एक वेळ तक्रार केल्यानंतर वारंवार लेखी पाठपुरावा करून निविदा प्रक्रियांमध्ये पारदर्शकपणे काम करण्यासाठी देशमुख यांनी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला.
यानंतर मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात टाकली. नियमानुसार दीड ते दोन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया निकाली काढणे गरजेचे असताना केवळ आपल्या र्मजीतील कंत्राटदाराला देण्यात काम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर निविदाप्रक्रिया थंडबस्त्यात टाकण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
वारंवार पाठपुरावा करूनही निविदा प्रक्रिया निकाली काढत नसल्याचे पाहून देशमुख यांनी मुंबई येथे जाऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत लेखी मागणी केली.
त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रधान सचिव आरोग्य यांना पत्र देऊन १0 सप्टेंबर २0१८ रोजी सदर निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले.परंतु दोन महिन्याचा कालावधी लोटूनही या प्रक्रियेची चौकशी झाली नाही. याबाबत कोणतीही माहिती प्रधान सचिव यांचेकडून देशमुख यांना प्राप्त झालेली नाही.
नवीन निविदेतील तरतुदीनुसार कामगारांना १३ ते १४ हजाराच्या जवळपास किमान वेतन व भत्ते यांच्यासह पगार मिळणे अपेक्षित होते. मागील सहा महिन्यांपासून ४00 कामगारांना या किमान वेतनाचा लाभ मिळाला असता. हक्काची पगार वाढ मिळावी म्हणून मागील अनेक दिवसापासून पप्पू देशमुख हे सातत्याने आंदोलन व पाठपुरावा करीत आहेत .परंतु चौकशीचे पत्र निघून दोन महिन्याचा कालावधी लोटल्यावर ही अजून पयर्ंत चौकशी पूर्ण झाली नाही. परिणामी जुने कंत्राटदार यांना मुदतवाढ देण्याचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलेले आहे.मिळालेल्या माहितीनुसार मार्च २0१९ पयर्ंत ही मुदतवाढ देण्यात येणार आहे.
याचाच अर्थ असा की निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे कामगारांना सुमारे वर्षभरपेक्षा जास्त कालावधीसाठी किमान वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे.