तिरखेडी जि.प.शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

0
20
सालेकसा,दि.26ः-तालुक्यातील तिरखेडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक केंद्र शाळेत दोन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच योगेश कटरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या दुर्गाताई तिराले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे शासकीय शाळेत प्रवेश कमी होत असताना तिरखेडी येथील शाळेत वेगळेच चित्र बघायला मिळते. तिरखेडी येथील केंद्र शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या भरघोष असून येथे एक अभिनव उपक्रम राबवण्यात आले. खाजगी कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश न करता याच शाळेत कॉन्व्हेंटची व्यवस्था करण्यात आली. या अभिनव उपक्रमात पालकांचा सुद्धा सहभाग लाभल्याने त्याचे तोंडभरून कौतुक मंचावरील उपस्थित अतिथींनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दुर्गाताई तिराले यांनी शाळेच्या विकासासाठी शक्य तेवढे नेहमीच सहकार्य असल्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मंचावर पोलीस पाटील राजेंद्र पटले, गोपाल तिराले, निकेश गावड, भुमेश्वर भोंडेकर, लता बोपचे, वनिता पवार, गजानन कटरे, टिकाराम पटले, राहुल हटवार इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख एस.जे.जोगी यानी केले.ज्योती पटले यांनी सूत्र संचालन केले तर आभार ए.जे. कटरे यांनी मानले. एस.आर. पारधी, आय.एस.बरेवार,पालेश्वरी कटरे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर   कर्मचारी यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.