अखेर विद्यार्थी व पालकांसमोर झुकले प्रशासन

0
19

तिरोडा,दि.04 : तालुक्यातील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वीचे परीक्षा केंद्र राजकीय दबावाखाली अन्यायकारकरित्या बंद करण्यात आले. हे केंद्र पूर्ववत सुरू करण्यात यावे याकरिता २ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सुकडी/डाक. समोर संघर्ष समितीच्या नेतृत्वात पालक, शिक्षक विद्यार्थी आमरण उपोषणावर बसले. शेवटी विद्यार्थी व पालकांसमोर प्रशासनाने झुकून परीक्षा केंद्र पूर्वरत ठेवण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद गोंदियाचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समितीतर्फे नागपूर विभागीय शिक्षण मंडळ, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व संबंधितांना निवेदन देण्यात आले. मात्र, यावर लक्ष देण्यात न आल्याने २२ जानेवारी रोजी तिरोडा तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे सांकेतिक उपोषण करण्यात येऊन त्वरित हे केंद्र बहाल करण्यात न आले तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आल्याप्रमाणे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सुकडी/डाक. समोर जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, अंजनाबाई कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगावचे प्राचार्य डी.डी. पटले, ठाणेगाव येथील गोविंदराव क. महाविद्यालयाचे प्राचार्य कोसरकर, सर्व विद्यार्थ्यांचे पालक व सुकडी परिसरातील नागरिक असे सुमारे २ हजार नागरिकांनी येथे उपोषण करणार्‍यांना सर्मथन देण्याकरिता जमून ११ वाजता मदन पटले, रमनीय सयाम, नीलेश बावनथळे आमरण उपोषणास बसले. तर सुमारे २५ ते ३0 लोक साखळी उपोषणाकरिता बसले असता दुपारी १ वाजताच्या दरम्यान, आ. विजय रहांगडाले यांनी येथे येऊन नागपूर विभागीय मंडळ नागपूरतर्फे १ फेब्रुवारी २0१९ रोजी प्राचार्य जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय डाकराम/सुकडी यांचे नावे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी काढलेला आदेश वाचून दाखविला. त्यात येथील १२ वीचे परीक्षा केंद्र क्र.७७0 पूर्ववत करण्यात आले असून फेब्रुवारी २0१९ चे परीक्षा केंद्र कायम ठेवण्यात आले. असे लेखी आदेश आमदारांनी वाचून दाखवून प्राचार्यांच्या स्वाधीन केले. आमदार रहांगडाले यांनी शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून केंद्र क्र.७७0 सुरू करण्याच्या सूचना विभागीय मंडळ नागपूर यांना कराव्या, अशी शिष्टाई केल्यावरून नागपूर विभागाचे अध्यक्ष देशपांडे यांनी हे केंद्र पूर्ववत केल्याने आ. रहांगडाले यांची शिष्टाई कामी आली. यावेळी जगदीश बावनथळे, गजानन पटले, सतीश वालदे, श्यामदेव जगणे, विक्की जगणे, इंद्रकला बावनथळे, रामू टेकाम, ओमकार पटले, दिनेश बघेले, विद्यार्थिनी श्‍वेता येडे यांच्या उपस्थितीत आमदारांनी आदेश प्राचार्यांच्या स्वाधीन केला व उपोषणकर्त्यांना निंबू पाणी पाजून उपोषण समाप्त केल्याने येथे उपोषणाला बसलेले व उपाषणाला सर्मथन करणारे विद्यार्थी, पालक व नागरिकांनी केलेले आंदोलन यशस्वी झाल्याने उपोषण समाप्त करण्यात आले व आमदार विजय रहांगडाले यांचे आभार मानले.