आत्मसर्पित नक्षल्यांसह ५४ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा उत्साहात

0
29

गडचिरोली,दि.04ःः जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली, मैत्री परिवार संस्था नागपूर व साई भक्त सेवक परिवार नागपूर यांच्यावतीने ३ फेब्रुवारी रोजी आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आदिवासी सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या आदिवासी सामूहिक विवाह सोहळय़ात गडचिरोली जिल्ह्यातील ५४ आदिवासी जोडप्यांचा विवाह आदिवासी समाजाच्या रितीरिवाजानुसार, आदिवासी परंपरेनुसार लावून देण्यात आला. यामध्ये ५ आत्मसर्मित नक्षल्यांचाही समावेश आहे.
या विवाह सोहळय़ाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरीचे न्यायाधीश सुनिल महाले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. मोहीत गर्ग, अजय बंसल, सीआरपीएफचे कमांडंट श्रीराम मीना, नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंचा सुगंधा मडावी, डॉ. कुंभारे, मैत्री परिवार नागपूरचे प्रमोद पेंडसे, गंगाराम सासरकर, निरंजनभक्त सेवक समितीचे सुनिल जैस्वाल, सामाजिक कार्यकर्ते वासेकर, साई दत्ता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली पोलिस दलामार्फत जिल्ह्यातील आदिवासी जनतेसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आर्थिक परिस्थिती अभावी आपल्या मुला-मुलीचे विवाह थाटात करु शकत नाही. त्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पोलिस विभाग व मैत्री परिवार संस्थेच्यावतीने या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. विवाहबद्ध झालेल्या आदिवासी जोडप्यांना गडचिरोली पोलिस विभाग व मैत्री परिवार नागपूर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते देण्यात आल्या.
सामुहीक विवाह सोहळय़ाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. माधुरी यावलकर यांनी मानले. विवाह सोहळय़ाच्या यशस्वीतेसाठी अप्पर पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, अहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच उडाण फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.