शिक्षणाचे व्यापारीकरण बहुजनासांठी धोकादायक-आ.पाटील

0
9

गडचिरोली,दि.21 : भाजप सरकारची शैक्षणिक धोरणे बहुजनांसाठी मारक आहेत. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला विरोध करायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या जुन्या सत्ताधाऱ्यांनी अहंकार बाजुला सारून लवचिक व्हायला पाहीजे. सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीत एकजुटीने लढावे, अशी अपेक्षा व्यक्त करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात लोकभारतीही आपले उमेदवार उतरविणार, अशी माहिती आ.कपिल पाटील यांनी शनिवारी सायंकाळी येथे पत्रपरिषदेत दिली.
शिक्षक भारती या शिक्षकांच्या अराजकीय संघटनेचे नेतृत्व करणारे शिक्षक आमदार पाटील यांनी शनिवारी दुपारी आपल्या लोकभारती या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करून युवक मेळावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी मोठ्या पक्षांनी मोठेपणा दाखवत छोट्या पक्षांनाही सोबत घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आधी काँग्रेसचे धोरण आम्हाला योग्य वाटत नव्हते. पण भाजपचे धोरण त्याहीपेक्षा भयंकर निघाले.
या सरकारने राज्यात सर्वाधिक खासगी विद्यापीठ निर्माण केले. ५ हजारावर स्वयंअर्थसहाय्यित शाळा वाटल्या. शिक्षणाचे हे व्यापारीकरणच असून यातून सरकारी शाळा बंद केल्या जातील. त्यामुळे त्या शाळांवर असणाऱ्या बहुजन, मागासवर्गीय शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल. एवढेच नाही तर बहुजन, मागास गोरगरीब विद्यार्थी खासगी शाळांमधून शिक्षणच घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था केली जात आहे. वास्तविक सर्व शाळा अनुदानित करून त्यात मराठी हा विषय सक्तीचा करावा, अशी आपली भूमिका असल्याचे आ.पाटील म्हणाले.
नक्षलवाद ही आर्थिक समतेची लढाई आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी आधी विषमता संपविली पाहीजे. हिंसेने प्रश्न सुटत नाही. पण इथे मारणारे आणि मरणारे तेच लोक आहेत. नक्षलवाद रोखण्यासाठी शासन जो पैसा खर्च करत आहे तो विकास कामांवर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजेश कात्रटवार, अतुल देशमुख, भाऊराव पत्रे, प्रा.संजय खेडीकर, उमेश उईके आदी उपस्थित होते.