23.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home शैक्षणिक गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक पदभरतीची शासन मान्यता संशयास्पद-उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक पदभरतीची शासन मान्यता संशयास्पद-उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गोंडवाना विद्यापीठ पदभरतीत ओबीसींना डावलले

0
689

गडचिरोली,दि.20ः-गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याकरीत निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापकांची पदभरती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेली मान्यता संशयास्पद असून या पदभरतीत ओबीसींना
डावलल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.या सर्व प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांनी केली आहे.तसेच ओबीसी युवकांना या लढ्यात सहभागी होऊन पदभरतीमध्ये झालेल्या अन्यायाविरुध्द लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील 36 प्राध्यापकांच्या पदभरतीमध्ये ओबीसींना एकही जागा देणयात आली नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या 45 टक्क्याचावर आहे.एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाला एकही जागा असू नये यापेक्षा ओबीसी समाजाची शोकांतिका काय असू शकते? याच पद्धतीने भरतीप्रक्रिया सुरू राहिल्यास भविष्य ओबीसी समाजातील एकाही युवकाला प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहता येणार नाही,हे स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदभरती मध्ये एकूण रिक्त पदांना आरक्षण पद्धती रद्द करून विभाग निहाय आरक्षण लागू केले आहे.विभाग निहाय आरक्षणामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे ही छोट्या संवर्गात मोडतात. माननीय उच्च न्यायालय मुंबईने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग( एसीबीसी) साठी , 27 जून 2019 चा निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय सरळ सेवा पदभरती मध्ये 13 टक्के आरक्षण लागू केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयाद्वारे सुधारित शंभर बिंदुनामावली निर्गमित केली.या सुधारित शंभर बिंदुनामावलीनुसार छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांचे आरक्षण निर्धारित करता येत नाही.त्यामुळे हा शासन निर्णय विद्यापीठीय प्राध्यापकांच्या पदभरती मध्ये लागू होत नाही.हे शासनाच्या लक्षात येताच सामान्य प्रशासन विभागाने छोट्या संवर्गातील रिक्त पदे (एसईबीसी व ईडब्ल्यूएस आरक्षण सहित) भरण्यासाठी 21 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केला.परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट 2019 ला या शासन निर्णयाला सामाजिक न्याय विभागाने स्थगिती दिली ते आजतागायत कायम आहे.
माहितीच्या अधिकाराखाली गोंडवाना विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंडवाना विद्यापीठाला 12B चा दर्जा प्राप्त करण्यासाठी वरील 36 पदे तातडीने भरण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने गोंडवाना विद्यापीठाला दिले होते. 21 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाला स्थगिती असल्यामुळे, तसेच 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयातील बिंदुनामावली विद्यापीठीय प्राध्यापकांच्या पदभरती साठी लागू होत नसल्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने 4 जुलै 2019 मधील मार्गदर्शक सूचना व दिलेली उदाहरणे तसेच यापूर्वीच्या विविध शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन बिंदुनामावली तयार केली.या बिंदुनामावलीनुसार प्रत्येक विभागासाठी ओबीसीला एक पद दिल्याचे दिसून येते. बिंदूनामावली जेव्हा विभागीय आयुक्त( मागासवर्ग कक्ष) नागपूर यांचे कडे प्रमाणित करण्यासाठी पाठवण्यात आली तेव्हा छोट्या संवर्गातील पदभरतीतील संबंधित 21 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाला स्थगिती असल्यामुळे ही बिंदू नामावली प्रमाणित करून देण्यास नकार दिला.यासंदर्भात त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला मार्गदर्शन मागितले.ही बाब माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या पत्रावरून लक्षात येते. यानंतर गोंडवाना विद्यापीठाने उपसचिव सामान्य प्रशासन विभाग 16- ब मंत्रालय, मुंबई यांच्याकडे सदर बिंदूनामावलीला अंतिम मान्यता प्रदान करण्यासाठी 26/11/19 चे पत्रान्वये विनंती केल्याचे दिसून येते.परंतु या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाने तयार केलेली बिंदुनामावली बदलवून नवीन बिंदुनामावली तयार केली.परंतु हा बदल करीत असताना कोणत्याही शासन निर्णयाचा आधार सांगण्यात आलेला नाही.उलट गोंडवाना विद्यापीठाच्या बिंदूनामावली तील ओबीसी 1 पद व एसीबीसी 1 पद नाकारण्यात आले. 21 ऑगस्ट 2019 या शासन निर्णयाला स्थगिती, 4 जुलै 2019 च्या शासन निर्णयातील बिंदुनामावली सदर पदभरती लागू होत नसताना, शासनाच्या कोणत्या शासन निर्णयाचा आधार घेतला. याबाबत जिल्ह्यातील जाणकार मंडळी सुद्धा अनभिज्ञ आहे. सामान्य प्रशासनाच्या 16 ब, या विभागाने प्रमाणित केलेली बिंदुनामावली ही संशयास्पद असल्याने उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. तसेच् या बिंदु नामावली च्या आधारे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गोंडवाना विद्यापीठाला प्राध्यापकांची पदभरती करण्यासाठी दिलेली मान्यता रद्द करावी अशी शासनाला विनंती केली आहे.
विद्यापीठीय प्राध्यापकांच्या पदभरती मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार अर्ज करीत असतात सध्या देशातील बऱ्याच भागात कडक संचारबंदी सुरू आहे. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. जिल्ह्यातील पुढील परिस्थिती सांगता येत नाही. गोंडवाना विद्यापीठाने प्रथम 20एप्रिल त्यानंतर 11 मे व आता 31 मे पर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्राच्या 11 संच्या सहित अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे. तसेच अर्थमंत्रालयाने 4 मे 2020 रोजी, मार्च 2020 पर्यंत मंत्रिमंडळानी मान्यता दिलेल्या योजनावर खर्च करण्यास बंदी घातली आहे.तसेच तसेच आरोग्य विभागा शिवाय कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारच्या नवीन पदभरती करू नयेत अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेले आहेत. अशाही परिस्थितीत गोंडवाना विद्यापीठ अर्ज दाखल करण्याची मुदतवाढ सतत देत आहे.परंतु पदभरती प्रक्रियेला स्थगिती द्यायला मात्र तयार नाही.
वरील दोन्ही मुद्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पदभरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी,आणि ओबीसीवर झालेला अन्याय दूर करण्यात यावे असे निवेदन राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,उच्च शिक्षण मंत्री,मंत्री ओबीसी विभाग यांना पाठवून करण्यात आले आहे.परंतु अजूनपर्यंत या संदर्भात शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने पुढील आंदोलनासाठी ओबीसी समाजातील जे जे विद्यार्थी या पदांसाठी पात्र आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच इतर ओबीसी युवकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आंदोलनासाठी सज्ज राहावे असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांनी केले आहे.