अर्जुनी मोरगाव दि.14:: नवेगावबांध येथे गावातील सर्व शाळा सुरु ठेवायच्या की, बंद ठेवायच्या या संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत ३१ जुलैपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकित घेण्यात आला आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने जिल्ह्यात २६ जूनला शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत सध्या चाचपणी सुरू आहे. ज्या गावात शाळा आहेत अशा गावातील व्यवस्थापन समितीने ठराव करून शाळा सुरू करायची किंवा नाही. अशा आशयाचा ठराव शिक्षण विभागाला पाठविण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या सभेत नवेगावबांध येथील शाळा ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तर शाळा सुरू करण्यासंदर्भात ३१ जुलैनंतर निर्णय करण्यात येणार असल्याचे सरपंच अनिरूध्द शहारे यांनी व्यक्त केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी नवेगावबांधचे सरपंच तथा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध शहारे होते. विशेष सभेत गावात ३१ जुलैपर्यंत शाळा सुरु करण्यात येऊ नये. असा निर्णय घेण्यात आला. सध्या शाळा सुरू करण्या करिता पोषक वातावरण नाही. पुणे, मुंबई, अहमदाबाद आदी ठिकाणावरून, बाहेर जिल्ह्यातून तसेच रेड झोन मधून रोजगार, शिक्षणासाठी गेलेले गावातील नागरिक व विद्यार्थी गावात येत आहेत. त्यामुळे कोण कुठून येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवेगावबांध व परिसरातील गावातून विद्यार्थी येथे येतात. त्यामुळे शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळा सुरू करण्यास सध्या पोषक वातावरण दिसून येते नाही. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत येथील सर्व शाळा सुरू करण्यात येवू नये. असे या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नवेगावबांध येथील सर्व शाळा ३१ जुलैनंतर पुन्हा सर्वच शाळा सुरू करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावून पुढील निर्णय घेण्यात येईल. असे ठरविण्यात आले आहे. या विशेष सभेला उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण, तलाठी पुंडलिक कुंभरे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.





