महिलांना गोडंबी व्यवसायासाठी ‘तेजश्री’चा आधार

0
36
  • महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम

वाशिम, दि. ०६  : ग्रामीण भागातील असंघटीत महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करुन त्यांना उद्योग-व्यवसायाची दिशा दाखवून स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्याचे काम ‘माविम’ अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ करीत आहे. वाशिम-मालेगांव मार्गावरील अमानी हे मालेगांव तालुक्यातील गांव. गावाची लोकसंख्या जवळपास ४ हजाराच्या आसपास. अनेक वर्षापूर्वी गावाच्या परिसरात असलेल्या जंगलातून ग्रामस्थ बिब्याच्या झाडाचे बिबे गोळा करुन त्यामधून गोडंबी काढण्याचे काम करायचे. आता व्यापारी मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातून बिबे खरेदी करुन अमानी गावातील महिलांना बिब्याची विक्री करतात. बिब्यातून महिलांनी काढलेली गोडंबी खरेदी करण्याचा हा व्यवसाय या गावात अनेक वर्षापासून आजही निरंतरपणे सुरु आहे. इथल्या महिला बिब्यातून गोडंबी काढण्यात तरबेज झाल्या आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मालेगांव-2 या लोकसंचालीत साधन केंद्राने अमानी गावात सहयोगिनीच्या माध्यमातून उन्नती, प्रगती, वैशाली संघर्ष, मॉं भिमाई, गौरी, आम्रपाली, जय मुंगसाजी, नारी शक्ती, रमाई, नवदुर्गा, संत मिराबाई, संत जनाबाई, राधेकृष्ण आणि ओम नमो शिवाय आदी १५ महिला स्वयंसहायता बचतगटांची स्थापना केली. या गटांशी १५२ महिला जुळल्या आहे. जवळपास १३ बचत गटातील महिला ह्या बिबे फोडण्याच्या व्यवसाय करतात. या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी माविमने त्यांना फिरता निधी देखील दिला. घेतलेला पैसा महिलांनी वेळीच परत केला. महिलांनी घेतलेला पैसा आपल्या उपयोगात आणून तो बचतगटात वेळीच परत केल्याने माविमने त्या महिलांचे उत्पन्न वाढावे, यासाठी ‘माविम’च्या तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून लोकसंचालीत साधन केंद्र मालेगांव-२ अंतर्गत अमानी येथील ४३ महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज ८ टक्के व्याज दराने उपलब्ध करुन दिले. या पैशातून महिलांनी व्यापाऱ्यांकडून बिबे खरेदी केले करून गोडंबी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेमधून अमानी येथील बचतगटातील जिजाबाई खंडारे, रंजना खंडारे, साधना सावळे, मीना खडसे, विजयमाला सरदार, माया खंडारे, पद्मिनी खंडारे, संगिता करवते, ललीता भुरकाडे, शारदा खंडारे, वैशाली खंडारे, निर्मला गायकवाड, सुमन खडसे, वनिता अंभोरे, लता खंडारे, जया लिल्हारे, ज्योती लाथाड, वर्षा सरकटे, लक्ष्मी खंडारे, सुरेखा गायकवाड, पद्मावती इटेकर, वनिता सावळे, सुशीला खंडारे, चंदा मोरे, उषा खंडारे, द्वारका खंडारे, पंचशिला खंडारे, मिरा झळके, जिजाबाई हिवाळे, संगिता खंडारे, पुनम खंडारे, उषा खडसे, आम्रपाली तायडे, रुपाली तायडे, रेखा कवडे, छाया खंडारे, सरीता खंडारे, सत्वशिला खंडारे, प्रियंका खंडारे, वर्षा सावळे, सविता माने, प्रिया माने व सुरेखा गायकवाड या ४३ महिलांनी कर्ज स्वरुपात घेतलेले १० हजार रुपये वेळेत परतफेड केले.

उन्नती बचतगटाच्या वनिता अंभोरे म्हणाल्या की, आम्ही अनेक वर्षापासून बिबे व्यापाऱ्यांकडून गावातच खरेदी करतो. बिब्यामधून गोडंबी काढण्याचे काम करतो. बिब्याचे तेल त्वचेसाठी मात्र घातक असते. गोडंबी काढण्यासाठी बिबे फोडतांना त्यामधून तेल त्वचेवर उडाले की त्वचेला इजा होते. अत्यंत खबरदारी घेवून बिब्यातून गोडंबी काढली जाते. ‘तेजश्री’तून १० हजार रुपयाचे कर्ज उपलब्ध झाल्याने गोडंबी उत्पादनाला चांगलाच हातभार लागल्याचे वनिता यांनी सांगितले. तेजश्रीच्या पैसातून गावातच व्यापाऱ्यांकडून १६५० रुपये प्रति क्विटंल या दराने चार क्विटंल बिबे खरेदी केले. एक क्विटंल बिब्यामधून १२ किलो गोडंबी काढली. प्रति किलो ५०० रुपये असा दर गोडंबीला मिळाला. महिन्याकाठी ४ क्विटंल बिब्यातून सरासरी ४५ किलो गोडंबी काढली जाते. यामधून बिबे खरेदीचा खर्च वजा जाता महिन्याला गोडंबी विक्रीतून १५ हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे वनिता यांनी सांगितले. कुटूंबाच्या अर्थकारणात या व्यवसायातून महिलांचा हातभार लागत आहे.

अमानी येथील बचतगटांच्या महिलांचे बिब्यातून गोडंबी वेगळी काढून त्याची विक्री करणे हे त्यांच्या उपजिविकेचे साधन ठरले आहे. बचतगटातील महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आहेत. या व्यवसायातून हाती येणाऱ्या पैशामुळे कुटूंबाच्या अनेक गरजा ह्या  महिलाच पुर्ण करीत आहेत. या महिला दर महिन्याला काही पैशांची बचत करीत असून मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. आपली मुले चांगले शिक्षण घेवून जबाबदार नागरीक बनण्यासोबत चागल्या नौकरीवर असावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. कुटुंबातील पुरुष मंडळी देखील आपआपली कामे करुन कुटुंबाच्या अर्थाजनात हातभार लावीत आहेत. ‘माविम’च्या तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेसमधून कर्ज उपलब्ध झाल्याने अमानीच्या ४३ महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत झाल्याचे वनिता अंभोरे यांनी सांगितले.