विदर्भातील ओबीसी शिष्टमंडळाची महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकाशी चर्चा

0
45

गोंदिया,दि.06:: ओबीसी विकासासाठी महाराष्ट्र शासनाने गठित ‘महाज्योतीकडून राबविण्यात येत असलेल्या विकास योजनेसंदर्भात चिंतन बैठक नागपूर येथे शनिवारला आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर महाज्योती संस्थेचे नवनियुक्त पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांची ओबीसी संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. ओबीसी विकास योजनेसंदर्भात त्यांना विचारणा करुन ओबीसी विकासासाठी नवनवीन कल्पना व योजनांची सुचना देखील त्यांना करण्यात आल्या.तसेच परत 15 दिवसांनी या सुचनांवर झालेल्या कामाचा आढावा घेण्याचे ठरविण्यात आले.
चिंतन बैठकीत ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पातळीवर ओबीसी विद्यार्थ्यासांठी शासनाकडून दिरंगाई होत असलेला वसतिगृहाचा प्रश्न, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू न होणे, कुणबी समाजाचा मराठा समाजासाठी गठित सारथी व ओबीसी समाजासाठी गठित महाज्योती या दोन्ही संस्थेतून लाभ देऊन शासनाकडून कुणबी विरुद्ध अन्य ओबीसी असा वाद निर्माण करुन ओबीसी चळवळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठी कुणबी समाजाला सारथीमधून वगळण्याची मागणी करण्यात आली.ओबीसी जनगणना आदि विषयावर मुद्दे उपस्थित करुन चर्चा घडवून आणली. तसेच ओबीसी विद्यार्थ्यासांठी तालुका व जिल्हा स्तरावर निवासी वसतिगृह सुरू करण्याची कार्यवाही करावी जिल्हापातळीवर महाज्योती संपर्क केंद्र गठीत करने, बार्टीच्या धर्तीवर समतादूत प्रमाणे जिल्हा, तालुकापातळीवर ‘महाज्योती सेवक‘ या पदांची नियुक्ती करून ओबीसी विकास योजनांचा प्रचार-प्रसार गावा-गावांत करणे, त्यासाठी माहिती पत्रके वाटप करणे, पुस्तके प्रसिद्ध करणे, महाज्योतीची वेबसाईट अपडेट करणे, ओबीसी विद्याथ्र्यांसाठी शैक्षणिक विकास योजना, शासकीय नोकरीत टक्का वाढविण्यासाठी विविध स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण योजनांसह ओबीसी युवक उद्योग – व्यवसायात पुढे येण्यासाठी कौशल्य विकासाच्या प्रशिक्षण योजना महाज्योती कडून राबविण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
चिंतन बैठकीत ओबीसी जनगणना समन्वयक बळीराज धोटे,महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे, राष्ट्रीय पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश पिसे, स्टुडंट राईट्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कोर्राम,प्रमोद काळबांधे, जिल्हा ओबीसी संघटनेचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तीर्थराज उके,सचिव अशोक लंजे, ओबीसी सेवा संघाचे प्रतिनिधी प्रेमेद्र चव्हाण, राम हेडाऊ, गोविंद वरवाडे, दळवी, शुभांगी मेश्राम,अंजली साळवे, श्रावण फरकाडे, निकेश पिणे आदी ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.