मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना;युवक,युवतींनी योजनेचा लाभ घ्यावा

0
33
  • सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

        गोंदिया,दि.6 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राज्याच्या उद्योग मंत्रालयामार्फत चालविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना आहे. राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजु लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये उत्पादक उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.

        या योजनेमध्ये शासनामार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के व शहरी भागातील लाभार्थ्यांना 15 ते 25 टक्के अनुदान दिल्या जाते. या योजनेंतर्गत वर्ष 2022-23 साठी मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट प्राप्त झाले असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

        योजनेतील सहभागासाठी पात्रतेच्या अटी अर्जदाराचे वय किमान 18 ते 45 वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास असावा. (10 लाखांच्या वरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण व 25 लाखांच्या वरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण असावा), अर्जदाराने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

        आवश्यक कागदपत्रे– पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना संबंधित ग्रामपंचायतीचे लोकसंख्या प्रमाणपत्र, पॅन कॉर्ड व संकेतस्थळावर दिलेले प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.

        अर्ज प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. या योजनेकरीता युवक व युवतींनी अर्ज करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे. आवश्यक माहितीकरीता जिल्हा उद्योग केंद्र, गोंदिया येथे संपर्क साधावा.