चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी‘लिडकॉम आपल्या दारी’ उपक्रम – सुनिता पुनवटकर

0
3
  • एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यशाळा

          गोंदिया, दि. 24 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ हे 50 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे महामंडळाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती चर्मकार बांधवांना होण्यासाठी गावोगावी व प्रत्येक तालुक्यात जनजागृती करण्यासाठी ‘लिडकॉम आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी व समाज बांधवांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवसापक सुनिता पुनवटकर यांनी केले.

         महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाअंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनातून ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेचे आयोजन नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्रीमती पुनवटकर बोलत होत्या.

        श्रीमती पुनवटकर म्हणाल्या, चर्मकार समाजाच्या उत्थानासाठी शैक्षणिक तसेच सर्वांगिण विकासाच्या योजना व महिला बचत गटाच्या उत्थानासाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार असून पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून महिला विकासावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी द्वारे चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन व प्रशिक्षण या प्रशिक्षणांच्या माध्यमातून चर्मकार समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरीता व सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी संगीता ढोणे (8788648964) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून जात पडताळणी विभागाचे उपायुक्त राजेश पांडे, सामाजिक न्याय विभागाचे श्री. मोहधुळकर, राज्य कार्यकारीणी सदस्य जे.डी.जगनीत, एमसीईडी कार्यकर्ता भाऊदिप सहारे, चर्मकार समाज अध्यक्ष गोंदिया प्रकाश तांडेकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी संगीता ढोणे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, सेवाभावी कार्यकर्त्या सडक/अर्जुनी मिराबाई झोडावने, सर्व महामंडळातील जिल्हा व्यवस्थापक, कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.