सामान्य माणसांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे- मुख्यमंत्री

0
9

नागपूर दि. ३: …अरे पोलिस आयुक्तांना फोन लावा… हे बघा सामान्य माणसं कामे घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत येतात. “त्यांना काही समाजाकंटकातून त्रास होत असेल, तर त्यांना संरक्षण देणं,… विश्वास देणं… हे आपल कामचं असते, असे सांगत असतानाच फोन लागतो… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिस आयुक्तांना म्हणतात, ‘संबंधिताचा तातडीने बंदोबस्त करा… शहरात भीतीचे वातावरण अजिबात नसले पाहिजे.”

चला, पुढे कोण आहे. एकएक करीत सर्वांचेच निवेदन स्वीकारीत असतात. प्रत्येकांशी मुख्यमंत्री बोलतात. शांतपणे त्यांचे प्रश्न समजावून घेतात. जी महिला तक्रार घेऊन आली होती, तिचे आपोआपच डोळे पाणावतात. आपली तक्रार पूर्ण ऐकण्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांना त्याचे गांभीर्य समजले अन् पटकन पोलिस आयुक्तांना फोन लावण्यास सांगितले. खरोखरच आम्ही धन्य झालो. आम्हाला वाटलेच नव्हते, मुख्यमंत्री एवढ्या तत्परतेने दखल घेतील, अशी कृतज्ञता व्यक्त करुन ती महिला व तिच्याबरोबर आलेले शिष्टमंडळातील नागरिक निघून जातात.

दोन्ही पायाने अपंग असूनही उद्योगक्षेत्रात भरारी घेणारे जयसिंग चव्हाण यांना मुख्यमंत्री शेजारी बसवून घेतात. त्यांचे प्रश्न व अपंगाच्या अडीअडचणी समजावून घेतात. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबंडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले भेटतात. येत्या दसऱ्याला येण्याबाबत निवेदन देत असतानाच… स्वीकारण्याआधीच नक्की… फुलझेले साहेब… नक्की येणार,… असे त्यांना आश्वासीत करतात.

काल रात्री मुख्यमंत्र्यांचे विमानाने नागपूरात आगमन झाले. विमानतळावरुनच ते जामठा स्टेडियम जवळ उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलची जागा पाहायला गेले. हा नियोजित कार्यक्रम नव्हता. अचानक पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना त्यांनी सांगितले, रात्रीचे दहा वाजले होते. परंतु कॅन्सरच्या रुग्णांचा वाढती संख्या पाहता हॉस्पिटल लवकर उभे झाले पाहिजे, अशी भावना मुख्यमंत्री व्यक्त करतात.

आज त्यांना स्व.माजी खासदार नामदेवराव दिवटे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी दुपारी दुपारी दोन वाजता लाखांदूर येथे जायचे होते. परंतु सकाळपासून रामगिरी निवासस्थानवर मोठ्या संख्येने लोक त्यांना भेटायला आले होते. शहरातीलच नव्हे तर बाहेर गावावरुनही आले होते. प्रवेशद्वारावरही लोकं थांबले होते. “सर्वांना येऊ द्या. एवढ्या लांबहून लोक येतात, त्यांची कामे आपण केलीच पाहिजे. मोठ्या आशेने ते येतात,” असे सांगत असतानाच त्यांना अडवू नका, असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देतात.

आज दिवसभर लोकांना मुख्यमंत्री भेटले. नागरिकांचे प्रश्न सुटावे म्हणून नागपूर येथील मुख्यमंत्री यांचे सचिवालय सुरु केले. समाधान शिबीर हे अभिनव अभिनव उपक्रम सुरु केले. त्यामुळे जनतेच्या आशापल्लवीत झाल्या आहेत. आज ते जवळपास चारशे ते साडेचारशे नागरिकांना भेटले. आपण सामान्य माणसांचे प्रश्न सोडविलेच पाहिजे. त्यांची गाऱ्हाणी ऐकलीच पाहिजे, असे ते अधिकाऱ्यांना सांगून पुढील कार्यक्रमासाठी निघतात….