हृदय प्रत्यारोपणातून वाचले तरुणाचे प्राण

0
4

मुंबई दि ४ :- ब्रेन डेड झालेल्या शरीरातील धडधडणारे हृदय ‘ग्रीन कॉरिडॉर’मधून अवघ्या नव्वद मिनिटांत मुंबईच्या रुग्णालयात पोचवून बावीस वर्षे वयाच्या एका रुग्णाला जीवनदान देण्याची ‘सहृदय’ कामगिरी पार पडली. पुणे आणि मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांनी दोन्ही शहरांतल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने आज दुपारी ही कामगिरी केली.

कवटीतील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे असाध्य हृदयरोगाचा सामना करीत असलेल्या व मुंबईत उपचार घेत असलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला सोमवारी पुण्यातील ४२ वर्षीय ब्रेनडेड महिलेच्या हृदयाने जगण्याची नवी उभारी दिली. या हृदयरोपण शस्त्रक्रियेसाठी पुणे आणि मुंबई या रस्तेमार्गे एरवी किमान चार-सहा तासांचे अंतर असलेल्या दोन शहरांमध्ये या धडधडत्या हृदयाला विद्युतवेगाचे पंख लावण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या जहांगिर हॉस्पिटलपासून मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलपर्यंत हवाई व स्थानिक रस्तेमार्गे ठीक तासाभरात हे हृदय येऊन पोहोचले व ४० वर्षांतील मुंबईच्या इतिहासातील पहिली यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया पार पडली.

सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सहा तासांची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर या तरुणाच्या शरीरात नवे हृदय धडधडू लागले व हे शुभवर्तमान फोर्टिस हॉस्पिटलमधील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटलचे हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी कौशल्यपूर्णरीतीने या हृदयरोपणक्रियेचे आव्हान पेलले.