सर्पदंशावरील लस स्वस्तात उपलब्ध?

0
11

नवी दिल्ली,दि. ९ -: -भारतात दरवर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात. आदिवासी भागाता आणि खेडय़ात सर्पदंश झाल्यास त्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार होत नाही. आर्थिक परिस्थितीअभावी अनेकांना औषधेही उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, सर्पदंशावरील औषध स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.
आर्थिक परिस्थितीअभावी अनेकांना सर्पदंशावरील औषध उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध करण्याची मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. त्याची दखल घेऊन ‘अ‍ॅण्टी स्नेक वेनॉम सीरम’ (एएसवीएस) हे सर्पदंशावरील औषध स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल.
‘दी अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अ‍ॅण्ड हायजिन’नुसार भारतात दरवर्षी सुमारे ४६ हजार जणांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. सरकारी आकडेवारी मात्र केवळ दोन हजार इतकी आहे. प्रत्यक्षात भारतात सर्पदंश होणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. अर्थात प्रत्येक साप विषारी नसल्याने दंश झालेल्या प्रत्येकाचा मृत्यू होत नाही. विषारी साप चावल्याने मृत्यू होण्यास वेळेवर उपचार न मिळणे, अज्ञान व सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर औषध उपलब्ध नसणे, असल्यास ते विकत घेण्याइतपत पैसे नसणे आदी कारणे आहेत.
सर्पदंशावरील औषध विकसित करण्यास भरसमाट खर्च येतो. त्यामुळे एएसवीएस स्वस्त दरात देशभरात सहजपणे उपलब्ध करणे व एएसवीएसच्या निर्मितीसाठी कंपन्यांना सूट (सबसिडी) देण्यासंबंधी आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येण्याची कृती समिती अहवाल तयार करणार आहे. ही समिती स्थापन करणार असल्याचे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी गडकरी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
* भारतात विषारी सापांच्या १३ जाती आहेत. त्यापैकी पाच जातीचे साप चावल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
* यात कॉमन कोब्रा, क्रेट कोब्रा, रसेल्स वीपर, सॉ स्के लड् व नोज पीट या सापांचा समावेश होतो.
* महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, ओदिशा, आसाम व पश्चिम बंगालमध्ये सर्पदंशाने मृत्युमुखी पडण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे.
* सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर औषधाऐवजी पारंपरिक उपचार केले जातात. विशेषत: आदिवासी भागात सर्पदंशाने मृत्यू होण्याचे परिणाम जास्त आहे.