चिचगडच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0
8

देवरी दि. ९ -: तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवारी आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम झाले.
ग्रामीण रुग्णालयात आ.पुराम यांच्या उपस्थितीत भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार यांच्या हस्ते रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी महामंत्री विरेंद्र अंजनकर, सभापती देवकी मरई, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, प्रवीण दहीकर, इंदरजितसिंग भाटीया आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर शासकीय आश्रमशाळा बोरगाव बाजार येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आमदारांचा विशेष सत्कार केला. आश्रमशाळा परिसरात पुराम व भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याच आश्रमशाळेच्या भवनात शेकडो रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
काही रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात अली. आ.पुराम यांच्या मदतीने त्यांच्यावर नागपूर येथे पुढील शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नेत्र तपासणीसाठी देवरीसोबतच लगतच्या सालेकसा, आमगाव तालुक्यातूनही स्त्री-पुरूषांनी गर्दी केली होती. या शिबिरानंतर चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सेवेकरिता १0८ क्रमांकावरून उपलब्ध होणार्‍या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार रामरतन राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी आ.पुराम यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा संपूर्ण दिवस समाजोपयोगी कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समाधान मिळाल्याचे आ.पुराम म्हणाले.