आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनतीतून यश संपादन करा- डॉ. विजय सूर्यवंशी

0
16

सामान्य ज्ञान परिक्षेत ९०७ विद्यार्थ्यांचा सहभाग

गोंदिया, दि. ९ : विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
आज ९ ऑगस्ट रोजी जिल्हा माहिती कार्यालय आणि स्टडी सर्कल गोंदिया यांच्या संयुक्त वतीने मनोहर मुन्सीपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परिक्षेतील सहभागी विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, स्टडी सर्कल शाखा गोंदियाचे संचालक श्याम मांडवेकर, मनोहर मुन्सीपल महाविद्यालयाचे श्री शर्मा, मुख्याध्यापक श्री रांजणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात स्पर्धा परिक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसून यश संपादन करावे यासाठी गोंदिया जिल्हयातून सुध्दा घडेल प्रशासकीय अधिकारी या अभिनव उपक्रमाअंतर्गत आज घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परिक्षेला जिल्हयातील विविध महाविद्यालयातील ९०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोदंवून स्पर्धा परिक्षाची तयारी करुन यश संपादन करण्याचे निश्चित केले आहे. हे आजच्या परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिसून आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्हा माहिती कार्यालय व स्टडी सर्कलचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या परिक्षांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटले पाहिजे की आपण अधिकारी व्हावे. त्यासाठी त्यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विविध स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रे, ग्रंथालये व वाचनालयांमध्ये जाऊन पुस्तकांचे वाचन करावे व नोट्स काढाव्यात.
जो विद्यार्थी यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत घेऊन सराव करतो तोच यशस्वी ठरतो असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चित यश प्राप्त होईल. घर व परिसर आपला स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. स्वच्छतेचे आणि व्यसनमुक्तीचे दूत म्हणून विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे असेही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री खडसे यांनी सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यामागची भूमिका विषद केली. यावेळी परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकराज्य स्टॉलला भेट देवून अंकांची पाहणी करुन पुस्तकांची खरेदी केली. हिवताप जनजागरण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या तंबाखूविरोधी जनजागृती विषयक सचित्र माहिती असलेल्या पोस्टर्स प्रदर्शनाची पाहणी परिक्षार्थींनी केली.