‘त्या’ अनाथ भावंडांना मिळाला हक्काचा निवारा

0
10

गोंदिया दि. २८: ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ असे म्हटले जाते. मग ज्यांची आई नाही व वडीलही नाही, त्यांची अवस्था कशी असावी? असाच प्रकार आसोली येथे घडला असून माय-बापाचे छत्र हरपलेल्या तीन भावंडांना रहायला घर नसल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला. शासकीय आवास योजनेकडूनही त्यांना नकारघंटाच मिळाली. अखेर माणसात देव शोधणार्‍या समाजसेवकांचे हात पुढे सरसावले व उभा झाला ‘त्या’ अनाथांचा हक्काचा निवारा.
गोंदिया तालुक्यातील आसोली येथील अनाथ बहीण-भावांची ही व्यथा आहे. सरिता, बादल व विशाल बालकदास गजभिये असे त्या भावंडांची नावे. गावात आजी-माजी लोकप्रतिनिधी असताना एकानेही त्यांची मदत केली नाही. साधी विचारपूससुद्धा केली नाही. या तिघांचे वडील सन २00३ मध्येच वारले. तर आईने सन २0१३ मध्ये जगाचा निरोप घेतला.
घरची मोठी असल्यामुळे सरितावर कुटुंबाची जबाबदारी आली. राहायला घर नसल्यामुळे तिने मिळेल ते काम करून शिक्षण पूर्ण केले अन घरही सांभाळला. बी.ए.बी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण झालेली सरिता आजही खासगी काम करून घर चालवते. मात्र घर बांधण्याची ऐपत नसल्याने त्यांना हक्काचा निवारा मिळाला नव्हता.त्यातच सामाजिक कार्यकर्ते प्रा.सविता बेदरकर, ओबीसी सेवा संघाचे जिल्हा संघटक कैलास भेलावे, लॉर्ड बुद्धाचे रतन वासनिक, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, धनेंद्र भुरले, प्रा.निता बागडे, डी.डी. मेश्राम, माणिक गेडाम, हरिश गोपलानी, मनोज मेंढे व संपत चिखलोंडे यांच्यासह अनेक त्यांच्या मदतीला उभे झाले. त्यांच्या मदतीतून ‘त्या’ अनाथ भावंडांना आत हक्काचा निवारा मिळाला आहे.