जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांमध्ये खडाजंगी

0
9

भंडारा दि. २८: जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना ‘युजलेस’, ‘नॉट काम्पिटंट’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांना ‘गेट-आऊट’ म्हटले. जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकार्‍यांच्या खडाजंगीमुळे प्रकरण तापले आहे. हा प्रकार आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, तहसीलदार नरेंद्र राचेलवार, सुशांत बनसोडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रताप धरमशी यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारला दुपारी घडला.
पवनी येथील तहसील कार्यालयात २५ ऑगस्ट रोजी तहसीलदारांची सभा सुरु असताना एकाने सभेत जाऊन अधिकार्‍यांना शिवीगाळ केली. दुपारी ३ ते ५.४५ वाजेपर्यंत या दोघांचा तहसील कार्यालयात धिंगाणा सुरुच होता. तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी याची माहिती संबंधित पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याला दिली. मात्र तब्बल तीन तासानंतर पोलीस तहसील कार्यालयात पोहचले. तहसीलदारांनी स्वत: तक्रार दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली.
सदर इसमाला जामीन मिळाल्यामुळे तो २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांच्या निवासस्थानी पोहचला. त्यावेळी तहसीलदार हे एकटेच होते. तुला जे काही बोलायचे आहे, ते कार्यालयात येऊन बोल, मी नक्की ऐकेल, असे राचेलवार यांनी त्याला बजावले. मात्र त्याने हुज्जत घातली. या प्रकारामुळे तहसीलदारांसह कर्मचारीही धास्तावले. त्यामुळे त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली. यासंबंधी गुरुवारी दुपारी १२ वाजता पवनीचे तहसीलदार राचेलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भेट घेतली. मागील दोन दिवसांत घडलेला वृत्तांत तहसीलदार राचेलवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितला.
धास्तावलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके हे बाहेर येऊन जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत केले. पोलीस अधीक्षकांच्या कक्षात चर्चा चर्चा सुरु झाली. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षकांना घटना घडत असतानाही पोलीस वेळेवर कारवाई करीत नाही, असा प्रश्न जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विचारला. पोलीस अधीक्षकांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षकांना ‘यु आर नॉट वर्क प्रॉपरली अँण्ड युवर ऑफीसर नॉट टेकिंग अँक्शन इमिजीएटली’ असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांना ‘गेट आऊट’ म्हणाले. यावेळी आमदार चरण वाघमारे व अधिकारी उपस्थित होते.