सामान्य आदिवासी नक्षल चळवळीत मात्र वरिष्ठ नक्षल्यांची मुले उच्चशिक्षीत

0
11

 

 

खंडणीचा पैसा स्वत:च्या कुटुंबावर खर्च  

मोठ्या कंपन्यात आकर्षक पॅकेजवर करताहेत नोकरी

नक्षलवाद्यांचा दुटप्पीपणा उघड

नागपूर, दि. 3 – आदिवासी भागातील मुले शिकली तर आपल्या चळवळीचे काही खरे नाही, याची चिंता नक्षलवाद्यांना नेहमी भेडसावत असते. त्यामुळे कधी महाराष्ट्र दर्शन सहलीला विरोध तर कधी आदिवासी मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम नक्षलवाद्यांकडून सातत्याने सुरु असते. मात्र रक्ताच्या नातेसंबंधात नक्षलवाद्यांनी ही बाब जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली आहे. खंडणीतून मिळालेला पैसा स्वत:च्या कुटुंबावर खर्च करून नक्षलवाद्यांनी स्वत:च्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे. विशेष म्हणजे ही मुले मोठ-मोठ्या कंपन्यात आकर्षक पॅकेजवर नोकरीत करीत आहेत. आदिवासी जनतेसाठी एक न्याय आणि स्वत:च्या मुलांसाठी वेगळा न्याय, असा नक्षलवाद्यांचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे.

दोन डोळ्यांनी जग पाहता येते मात्र शिक्षणाने चांगली दृष्टी मिळते. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा मुख्य घटक आहे, हे सर्वश्रृत आहे. शिक्षण हा सर्वांचा मुलभूत हक्क असल्याने नक्षलग्रस्त भागातील मुला-मुलींच्या शिक्षणाला शासनानेसुध्दा प्राधान्य दिले आहे. मात्र आदिवासी भागातील मुले शिक्षणाकडे वळली तर आपली चळवळ संपुष्टात येईल, अशी भीती असल्याने तरुण आदिवासी आणि शालेय विद्यार्थ्यांची दिशाभुल करणे, त्यांना मारहाण करणे, बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जोर जबरदस्तीने नक्षल चळवळीत सामील करून घेण्याचे काम नक्षलवादी करीत आहेत. आपली खोटी चळवळ चालविण्यासाठी एकप्रकारे नक्षलवाद्यांनी आदिवासी नागरिकांना मरणासाठी सोडून दिले आहे. मात्र स्वत:च्या मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवून त्यांना उच्च शिक्षण देणे, खंडणीच्या पैशातून त्यांचे पालनपोषण करणे असा मतलबीपणासुध्दा नक्षलवादी करीत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या हिंसक चळवळीत सामील करून घेण्यासाठी माओवादी साहित्याचे वाटप करणा-या देवकुमार सिंह ऊर्फ अरविंद निशांत ऊर्फ सुजीत याचा मुलगा कानपूर आयआयटीमध्ये केमीकल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. चळवळीत कंपनी कमांडर असलेल्या मल्लराजी रेड्डी ऊर्फ सतेन्ना ऊर्फ सयन्ना ऊर्फ सागर ऊर्फ आलोक ऊर्फ देशपांडे ऊर्फ एसएएन ऊर्फ लक्ष्मणची मुलगी स्नेहलता विज्ञान शाखेची पदवी (बीएससी) पूर्ण करून आता कायद्याची पदवी (एलएलबी) घेत आहे. ग्रामीण आदिवासी नागरिकांना भुलथापा देऊन त्यांची दिशाभुल करण्यात माहीर असलेल्या कुख्यात विजय रेड्डी ऊर्फ सुगुलरी चिन्नान्ना ऊर्फ नागन्नाचा मोठा मुलगा बी.टेक

ची पदवी घेऊन तेलंगणा येथील बहुराष्ट्रीय कंपनीत लाखो रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करीत आहे. तर त्याचा छोटा मुलगा प्रताप बी.टेक च्या पदवी अभ्यासक्रमाला आहे. शहरी भागात चळवळीचा विस्तार करण्याची जबाबदारी असलेला कंपनी कमांडर के. के. मुरलीधरन ऊर्फ राजेंद्र ऊर्फ गोपी ऊर्फ राघव ऊर्फ विजयन्ना ऊर्फ सन्नीचा मुलगा नचिकेतन केरळ राज्यातील कोच्ची येथे सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करीत आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा वरिष्ठ नेता असलेल्या राजचंद्र रेड्डी ऊर्फ कट्टारामचंद्र ऊर्फ राजू दादा ऊर्फ गुडसा उसेंडीची मुलगी स्नेहा ऊर्फ डॉली बी.टेक ची पदवी घेऊन आयटी कंपनीत 5 लक्ष रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करीत आहे. तर त्याचा मुलगा दंतशास्त्र (डेन्टल) च्या अभ्यासक्रमाला आहे. विशेष म्हणजे या उसेंडीवर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची (डीकेएसझेडसी) जबाबदारी आहे. तसेच नक्षल  चळवळीतील डिव्हीजनचा सदस्य असलेल्या मारचेला यासबु ऊर्फ श्रीमन नारायण कैलाशमची मुलगी अंगणवाडी चालविण्याचे काम करीत आहे. तर पोलिट ब्युरो सदस्य मिशीर स्वत:च्या मुला-मुलींना चांगल्या शाळेत शिक्षण देत आहे.

उत्तर गडचिरोली – गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमेटी सदस्य पहाडसिंग उर्फ कुमारसाय कतलामीनेसुध्दा आपल्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी इच्छा पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली होती. पहाडसिंगने लिहिलेले हे पत्र काही दिवसांपूर्वी पोलिस विभागाच्या हाती लागले होते, हे विशेष.

आम्हीच तुमचे तारणहार आहोत, ही लोकशाही खोटी आहे, असे वारंवार आदिवासी बांधवांना सांगून त्यांची दिशाभुल करणारे नक्षलवादी मात्र खंडणीच्या पैशातून स्वत:च्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे आत्मसमर्पण करणा-या काही नक्षलवाद्यांनीसुध्दा या गोष्टीला दुजोरा दिला आहे. जंगलात भटकणा-या नक्षल सदस्यांजवळ वरिष्ठ कॅडर गरजेपुरतासुध्दा पैसा ठेवत नाही. त्यामुळे जंगलात सततची भटकंती, मरणाची भीती, खाण्यापिण्याची समस्या, वैद्यकीय सुविधांपासून वंचित अशा अनेक समस्या चळवळीतील नक्षलवाद्यांच्या वाट्याला आल्या आहेत. तर दुसरीकडे खंडणीच्या पैशावरच वरिष्ठ नक्षलवाद्यांचे कुटुंब सदन झाले असून सामान्य आदिवासींना जंगलात केवळ मरण्यासाठीच सोडले असल्याची भावना आत्मसमर्पितांनी बोलून दाखविली. त्यामुळे चळवळीतील नक्षलवाद्यांनी आतातरी वरिष्ठ कॅडरचा दुटप्पीपणा लक्षात घ्यावा. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन सुखी-समृध्द जीवनासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, असे आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी व पोलिसांकडून करण्यात येत आहे.