‘तिन्हीसांज’ लवकरच रंगभूमीवर

0
7

संगीत, नृत्य आणि रहस्याची अपूर्व सांगड
सिक प्रेक्षकांप्रमाणेच रंगभूमी आणि चित्रपटाशी संबंधित अनेक नामवंत मंडळीही मराठी रंगभूमीवरील नवनव्या प्रयोगांची आतुरतेने वाट पाहात असतात. असाच एक प्रयोग मराठी रंगभूमीवर होऊ घातला आहे, ज्याचं नाव आहे ‘तिन्हीसांज’.
मराठी रंगभूमीवर रहस्यमय नाटकांना जशी प्रदीर्घ परंपरा आहे, तशीच संगीत नाटकांनाही आहे. चित्रपटाचा रुपेरी पडदा बोलू लागण्यापूर्वी मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांनी यशाचे आणि कलेचे नवे मापदंड निर्माण केले होते. आता ‘तिन्हीसांज’मधून संगीत आणि रहस्य यांचा अपूर्व संगम घडवतानाच त्याला नृत्याचीही जोड देण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.
‘सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘तुला यावंच लागेल’ यांसारख्या यशस्वी आणि आशयघन नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘तिन्हीसांज’ या नाटकाचा मुहूर्त अलिकडेच गडकरी रंगायतन येथे सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गव्हाणकर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  अजय पूरकर, शीतल क्षिरसागर, सायली परब आदींच्या या नाटकात प्रमुख भूमिका असून १९३७ ते १९५० असा स्वातंत्र्यप्राप्तीच्या मागीलपुढील काळातील चित्रण यात बघायला मिळणार आहे.
‘सोबत संगत’ आणि ‘किमयागार’ या दोन नाटकांनंतर पुन्हा एकदा संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनातून हे आगळंवेगळं नाटक उभं राहात असून गीतेही त्यांचीच आहेत. परिक्षित भातखंडे यांचं संगीत असून प्रकाशयोजना राजन ताम्हाणे यांची आहे. जुना काळ यथोचित उभं करणारं नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं असून वेशभूषेची जबाबदारी पूर्णिमा ओक यांनी सांभाळली आहे. शेखर ताम्हाणे आणि राजन ताम्हाणे यांच्या ‘त्रिकुट’ या संस्थेतर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे.  नाटकाच्या तालमी वेगात सुरू असून लवकरच या नाटकाचा शुभारंभ रंगभूमीवर होणार आहे.