२७ नोव्हेंबरला येतोय ‘शिनमा’

0
16

वेदांत एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते अनिल जोशी यांची निर्मिती असलेला ‘शिनमा’ येत्या २७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सिनेमा म्हटला की झगमगाट, रूपेरी पडद्यामागील चमचमतं जग आणि त्या दुनियेत रमणारी नट मंडळी असा काहीसा ग्रह होतो. ‘शिनमा’ या शीर्षकावरून हा चित्रपटही असंच काहीसं घेऊन येणार असावा असं वाटणं सहाजिक आहे, पण तसं मुळीच नाही. नेहमीच अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणा-या दिग्दर्शक मिलिंद अरूण कवडे यांनी ‘शिनमा’मध्येही ही परंपरा जोपासली आहे. ‘शिनमा’ केवळ मनोरंजन नव्हे तर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वेदांत एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते अनिल जोशी यांची निर्मिती असलेल्या ‘शिनमा’ या चित्रपटात एका गावातील कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी एक युनिट एका गावात पोहोचतं. ते गाव इतकं दुष्काळी असतं की तिथे प्यायला पाणीही मिळणं दुर्मिळ असतं. अशा परिस्थितीत चित्रीकरण करताना चित्रपटाच्या टिमला आलेला अनुभव ‘शिनमा’मध्ये मनोरंजकपद्धतीने मांडण्यात आला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सद्यपरिस्थिती दाखवण्यात आली आहे. आशयघन कथानकाला, उत्कंठावर्धक पटकथा, अर्थपूर्ण संवाद, कसदार अभिनय, नेत्रसुखद चित्रीकरण, सुरेख मांडणी, कर्णमधुर संगीत आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सजवण्यात कुठेही कसर ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘शिनमा’मध्ये प्रेक्षकांना एक सामाजिक विषय मनोरंजक शैलीत पाहायला मिळेल.
हा चित्रपट वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारा असल्याचं मत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी व्यक्त केलं आहे. चित्रपटाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘चित्रपटाचा विषय जरी सामाजिक असला तरी मनोरंजनाची चौकट मोडून कुठेही उपदेशाचे डोस पाजण्यात आलेले नाहीत. आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याचं वास्तववादी चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. एका गंभीर विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना चिमटा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरी भागात पाण्याची चंगळ असते. त्यामुळे तिथल्या लोकांना त्याची किंमत कळत नाही, पण गावामध्ये माय माऊलींना आजही पाण्यासाठी मैलो न मैल पायपीट करावी लागत आहे. शहरातील मंडळी जेव्हा चित्रीकरणासाठी गावात पोहोचतात तेव्हा त्यांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि तिथली परिस्थिती समजल्यानंतर ते काय पावलं उचलतात यावर हा चित्रपट आधारित आहे.’’
‘शिनमा’च्या निमित्ताने प्रथमच निर्मितीकडे वळलेले अनिल जोशी मूळात एक इंजीनियर आहेत. चित्रपटावरील प्रेमापोटी त्यांनी ‘शिनमा’च्या निर्मितीचं शिवधनुष्य उचललं आहे. याबाबत ते म्हणाले, ‘मी मूळचा नगरमधील आहे, त्यामुळे शहरी जीवनासोबतच ग्रामीण भागातीलही वास्तव मी जवळून पाहिलेलं आहे. या चित्रपटाची संकल्पना जेव्हा माझ्यासमोर मांडण्यात आली तेव्हा मला ती खूप आवडली. विनोदासोबत एक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याने ‘शिनमा’ची निर्मिती करायचं ठरवलं. सिनेमा बनवताना तो साग्रसंगीत असावा याची काळजी घेतली आणि एक परिपूर्ण चित्रपट तयार केला आहे. जे जे उत्तम आहे ते ते देण्याचा प्रयत्न ‘शिनमा’च्या संपूर्ण टिमने केला आहे. प्रेक्षकांनाही हा प्रयत्न नक्कीच आवडेल.’
‘शिनमा’ची कथा मिलिंद कवडे, अशोक झगडे आणि प्रकाश भागवत यांनी लिहिली आहे. मिलिंद कवडे यांनी स्वत ‘शिनमा’ची पटकथा लिहिली असून संवादलेखन सागर वानखेडे आणि दिपक ठुबे यांनी केलं आहे. अजिंक्य देव, किशोरी शहाणे, यतिन कार्येकर, विजय पाटकर, संस्कृती बालगुडे, गुरलीन चोप्रा, आनंदा कारेकर, अंशुमन विचारे, गणेश यादव, सौरभ गोखले, अरूण कदम, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, आशिष पवार, जयवंत वाडकर, निशा परूळेकर या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅमेरामन सॅन्टोनिओ टेरेझिओ यांनी या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे.
या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील सर्वच गाणी एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. आयटम साँग, रोमॅँटिक साँग, मोंटाज साँग तसंच प्रमोशनल अशा वेगवेगळ्या शैलीतील गाण्यांचा यात समावेश आहे. पाचही गाणी वेगळ्या मूडमधील असल्याने संगीतप्रेमींच्या ओठांवर सहज रूळणारी आहेत. कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणाऱया चार गीतांना संगीतकार वरूण लिखते यांनी संगीत दिलं असून एक गाणं रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे.
गीतकार जय अत्रे, राहुल साळवे आणि सागर वानखेडे यांनी ही गाणी लिहिली असून आनंद शिंदे, कविता निकम, दिपाली साठे, रोहित राऊत, मनीष राजगिरे, आदर्श शिंदेने यांनी गायली आहेत. सध्या सोशल मिडियावर गाजत असलेल्या “चिमणी उडाली भुर्र…’’ हे गाणं कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि गुरलीन चोप्रा यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून स्वत गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.