८९ वे मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान

0
10

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्या असून हे संमेलन येत्या १५ ते १८ जानेवारी असे चार दिवस भरणार आहे. विविध विषयांवरील परिसंवाद, निमंत्रित कविसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांबरोबरच ज्ञानपीठ विजेत्यांशी संवाद हे या संमेलनाचे वैशिष्ट्ये असणार आहेत.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी गुरुवारी साहित्य संमेलनाच्या तारखा व कार्यक्रमांची घोषणा पत्रकार परिषदेत केली. साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, ८९ व्या साहित्य संमेलनाचे संयोजक सचिन ईटकर आदी यावेळी उपस्थित होते. दि. १५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत हे साहित्य संमेलन होत असल्याने या दिंडीचा विषय हा ‘उद्योग व साहित्य दिंडी’ असा असणार आहे. या दिंडीमध्ये पिंपरी-चिंचवड येथील उद्योग, कामगार, शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था, कलावंत, साहित्यिक सहभागी होणार असून या संध्याकाळी सहा वाजता ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी या ग्रंथदिंडीचा समारोप होईल. त्यानंतर ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप होईल.