गोरेगाव नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात ़:अध्यक्षपदी सीमा कटरे तर उपाध्यक्ष आशिष बारेवार

0
6

गोरेगाव दि.२७ः येथील नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत नगरविकास पॅनलच्या सदस्यांनी जाण्याच्या निर्णय घेतल्याने नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान काँग्रेसच्या नगरसेविका सीमा राहूल कटरे यांना मिळाला.तर उपाध्यक्षपद नगरविकास समितीचे आशिष बारेवार यांना मिळाले.बारेवार यांनी निवडणुकीपुर्वी आपल्या सदस्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गोरेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे.
नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगर विकास पॅनेलचे चार, काँग्रेसचे पाच, भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडून आले होते. येथे बहुमत कोणत्याही पक्षाला नसल्यामुळे अध्यक्ष कोण होणार? याविषयी गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू होती. आज पार पडलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीने चित्र स्पष्ट झाले. काँग्रेसमध्ये नगर विकास पॅनेल समाविष्ठ झाल्याने चित्र स्पष्ट झाले.
अध्यक्षपदाकरिता काँग्रेसच्या सिमा कटरे, भाजपच्या उषा रहांगडाले यांनी अर्ज दाखल केले. तर उपाध्यक्षपदाकरिता अपक्ष आशिष बारेवार आणि भाजपचे हिरालाल रहांगडाले यांनी अर्ज दाखल केले होते. सिमा कटरे आणि आशिष बारेवार यांना प्रत्येकी १० मते पडली. त्यांची अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव सदस्य डॉ.रुस्तम येळे यांनीही काँग्रेसला साथ दिली. यावेळी जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे,काँग्रेस पर्यवेक्षक व्यंकट पाथरु,जगदिश येरोला,मलेश्याम येरोला,तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले,लक्ष्मीकांत बारेवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.