पाणवठ्यांवरील पक्षी गणना 20 डिसेंबरला

0
8
नागपूर दि. १३– जंगल व नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशीच काय, विदेशी पक्ष्यांचेही बस्तान आहे. या पक्ष्यांची नोंद करण्यासाठी 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 32 तलावांवर वार्षिक पक्षी गणना केली जाईल. पक्षी गणनेचा पहिला टप्पा वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मार्गदर्शनात होणार आहे.
 
10 जानेवारी 2016 रोजी पक्षी गणनेचा दुसरा टप्पा आहे. सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत पक्षी गणना होईल. गेल्या वर्षी या पक्षी गणनेत नागपूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यासाठी काही सामाजिक व पशुपक्षीप्रेमी संघटनांची मदत घेतली जाते. जिल्ह्यात यासाठी 32 तलावांची निवड केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षी व त्याच्या हालचाली टिपता याव्या यासाठी वन विभागाने पक्षितज्ज्ञ व प्रेमींसाठी तलावाशेजारी व्यवस्था केली आहे. 
 
जिल्ह्यातील तलावांवर देशी व विदेशी प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर राहतो. जिल्ह्यात येणाऱ्या या पक्ष्यांची नोंद गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. विदेशी पक्ष्यांची जिल्ह्यात होत असलेली वाढ किंवा घट ही बाब आता वन विभागाने गांभीर्याने घेतली आहे. पक्षी अभ्यासक व बर्ड ऑफ विदर्भचे सल्लागार डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्या मार्गदर्शनात पक्षी गणना होत आहे. पक्षी गणनेत सहभागी होण्यासाठी अविनाश लोंढे मो.क्र. 9422803717, सुरेंद्र अग्निहोत्री 7350261116, नितीन मराठे 9421198333, कुंदन हाते 9422840223, विनीत अरोरा 9860062994 यांच्याशी संपर्क साधावा.