हागणदारीमुक्तीकडे गोसेचा प्रवास ‘लय भारी’

0
11

भंडारा :दि.23- ‘गाव तसं चांगलं, पण हागणदारीने वंगलं’ अशी एक म्हण प्रचलित आहे. पवनी तालुक्यातील गोसे (बुज)हे गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत असून या गावाला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव शांताराम कुदळे यांनी भेट दिली. यातून गावकर्‍यांनी शौचालय वापराचा घेतलेला निर्णय ‘लय भारी’ असल्याची प्रचिती त्यांना आली.
राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात स्वच्छता मिशन कक्ष पाणी व स्वच्छतेच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. या अनुषंगाने ग्राम पंचायतींना क्षेत्र भेटी देण्यासाठी कुदळे हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते.त्यांनी पवनी येथे आढावा बैठक घेतली.यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान त्यांनी राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर त्यांनी लगतच्या गोसे बु. या गावाला भेट दिली. येथील त्यांनी शौचालयाची माहिती घेतली असता ते आश्‍चर्यचकित झाले. एकेकाळी उघड्यावर शौचास जाणार्‍या गावकर्‍यांनी शौचालय बांधणीला पसंती दिली असून अनेक नागरिकांचे शौचालय बांधणीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.यावेळी कुदळे यांनी हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणार्‍या गोसे गावातील जलसुरक्षक यांचेकडून पाणी व स्वच्छता विषयक माहिती जाणून घेतली. यावेळी ग्रामसेविका शीतल मोहनकर यांनी ग्रामपंचायतीची लोकसंख्या, कुटुंब संख्या, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, ब्लिचिंग साठ्याची उपलब्धता, शौचालय बांधकामाची स्थिती, कोरडा दिवस पाळणे आदींची माहिती दिली.
गावकरी शौचालयाचा वापर करीत असल्याने हिरव्या रंगाचे स्टीकर घरांना लावण्यात आले. यावेळी कुदळे यांनी सुंदर जीवन जगून आरोग्य सुदृढ ठेवावे अशी प्रतिक्रिया दिली.