सैनिक गाव म्हणून कातुर्ली ठरले ‘आयकॉन’

0
79

अडीच हजार लोकवस्तीत तब्बल 32 जवान : दोन तरूणींचाही समावेश

आज होणार सैनिक ग्राम प्रवेशव्दाराचे उदघाटन

गोंदिया. देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी सैन्यावर आहे. मात्र सैन्यात माझ्याघरचा नव्हे, तर बाजूच्या घरचा जावा, हा 2000 सालापर्यंतचा समज होता. तो समज खोडून काढत आमगाव तालुक्यातील एका लहानशा कातुर्ली नावाच्या गावाने संपूर्ण जिल्ह्यात आज आपले नाव लौकिक केले आहे. 1990 च्या दशकातच या गावाने दोन जवान देशाने दिले. जवळपास अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावाने आत्तापर्यंत तब्बल 32 जवान भारतीय सैन्य दलाच्या विविध शाखांमध्ये दिले आहे. त्यात दोन तरूणींचाही समावेश असून उच्चस्तरीय अधिकारी होण्याचा मान देखील यातील जवानांना मिळाला. हे गाव एक आदर्श गाव म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर झळकत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर जय जवान, जय किसान असा नारा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. देशाला हे दोनच घटक वाचवू शकतात, असा त्यांचा ठाम विश्वास होता. देशातील नागरिकांचे पालन-पोषण करण्याकरिता जशी शेतकऱ्याची गरज आहे. तशीच काम देशाला परकीय शक्तींपासून वाचविण्याचे काम देशाच्या सिमेवर लढणारे जवान करतात. मात्र सैन्य म्हणजे घरापासून महिनोमहिने लांब राहणे. कधी जीवाचे काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे समजून-उमजून देखील सैन्याचा मान राखत असले तरी सहसा कुणीही आपल्या पाल्याला किंवा घरच्या मुलाला सैन्यात पाठविण्यासाठी फारसे लक्ष घालत नव्हते. नोकरी नसेल तरी चालेल, शेती कसून घरातच राहा, असा समज होता. मात्र देशासाठी काहीतरी करायची जिद्द उराशी बाळगून आमगाव तालुक्यातील अगदी खेडेगाव असलेल्या कातुर्ली या गावातून प्रेमलाल पटले आणि कुवरलाल बिसेन हे दोन तरूण घरच्यांचा विरोध पत्करून सैन्य भरतीला गेले. त्यांची निवड देखील झाली. ते गावात यायचे तेव्हा त्यांची शिस्त आणि रुबाब बघून इतर तरुणांना देखील त्यातून प्रेरणा मिळाली. बघता बघता सैन्यात भरती होण्याची चढाओढ निर्माण झाली. तालुका आणि जिल्हा मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि गावात सराव तसेच मार्गदर्शनाची कसलीही सोय नसताना देखील येथून सैन्यात जाणाऱ्यांची फौज तयार झाली. आजघडीला या गावातील 32 जण भारतीय सैन्याच्या विविध दलांत कार्यरत आहेत. त्यात भारतीय सेन्यदल, केंद्रिय राखीव पोलीस दल, सिमा सुरक्षा दल, आयटीबीपी, सर्व अर्धसैनिक दलात ते कार्य करत आहेत. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. या गावात अद्यापही सैन्य दलात जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. दरवर्षी येथे भरतीत जाणाऱ्यांची रांग लागते. जिल्ह्यातच  नव्हे, तर राज्यात गावाचे नाव सर्वाधिक सैन्य असलेल्या कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून नावारुपास आणण्याचे ध्येय येथील तरूणांनी उराशी बाळगले आहे. हे गाव आजघडीला सैन्य दलात जाण्याची तयारी करणाऱ्यांचे आयकॉन ठरले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पदे
कातुर्ली गावातील तरूणांनी केवळ सैन्यात जावून शिपाई म्हणूनच काम करावे, हे ध्येय ठेवले नाही. तर पुढे जाण्याची जिद्द उराशी बाळगत वरिष्ठ पदांपर्यंत मजल मारली. प्रेमलाल मोहनकर सुभेदार मेजर, सुभेदार माणिक बिसेन, नायब सुभेदार लोकचंद कुंभलकर, अनिल भेलावे, ऑनररी नायब सुभेदार गणेश बिसेन, हवालदार म्हणून प्रेमलाल बिसेन, कुवरलाल बिसेन कामगिरी बजावत आहेत. एकूणच गावातील एक सुभेदार मेजर, एक सुभेदार, तीन नायक सुभेदार आणि 27 विविध पदांवर अन्य आहेत.
एक महिला पोलीस अधिकारी
ज्या प्रमाणे कातुर्ली गावातील तरूण भारतीय सैन्यदल आणि इतर तत्सम दलांमध्ये भरती होण्याकरिता धडपडले. तसेच महाराष्ट्र पोलीस दलात देखील भरती होण्यासाठी अनेकांची धडपड कायम आहे. त्यातच दोन वर्षांपासून मोसमी कटरे ही तरूणी पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झाली.
आज सैनिक ग्राम प्रवेशद्वाराचे लोकार्पण
गावातील सैनिकांनी एकत्र येत गावाच्या सिमेवर प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार सैनिक ग्राम प्रवेशद्वाराचे लोकार्पण उद्या 2 आँक्टोबंरला होणार असून यासाठी सर्व सैनिकांकडून 3.50 लाख रुपये गोळा करुन हे प्रवेशव्दार तयार करण्यात आले आहे.या बांधकामासाठी नागरिकांकडून एकही रुपया घेण्यात आलेला नाही.सैनिक गणेश बिसेन