अनिल ठाकरे ‘बेस्ट पीआरओ’

0
7

नागपूर : राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियातर्फे जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांना ‘बेस्ट पीआरओ’ उत्कृष्ट माहिती अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियातर्फे रविभवन येथे राष्ट्रीय जनसंपर्क दिन आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड होते. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. लोकेंद्र सिंग हे प्रमुख अतिथी होते.
‘एक राष्ट्र एक स्वर, जनसंपर्काच्या माध्यमातून विश्‍वासाचा सेतू निर्माण’ हा कार्यक्रमाचा विषय होता. यावेळी डॉ. लोकेंद्र सिंग यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक वागणुकीसह जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कातून विश्‍वासाचे नाते जोपासणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
जर एखाद्या कामाची आवड असेल तर तहान, भूक विसरून सृजनात्मक व तणावमुक्तीसह आनंददायक काम होऊ शकते. जनसंपर्क क्षेत्रात नवनवीन आव्हाने असली तरी, चांगला जनसंपर्क असल्यास कठीण काम सोपे होण्यास निश्‍चितच हातभार लागतो, असे मोहन राठोड म्हणाले. अनिल ठाकरे आणि महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनीही आपले विचार व्यक्त केले.
सत्येंद्र प्रसाद सिंग यांनी संचालन केले. मधुकर देशमुख यांनी आभार मानले.