गरजू व गरीब रुग्णांनी लाईफ लाईनच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्या – डॉ.विजय सूर्यवंशी

0
22

68fe52b2-d61f-46b5-a166-debe90a12e6cलाईफ लाईन एक्सप्रेसची पाहणी
गोंदिया,दि.२७ : गोंदिया जिल्हा मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व गरीब रुग्णांना लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
आज २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी रेल्वे इंजिन शेडजवळ आगमन झालेल्या लाईफ लाईन एक्सप्रेसला भेट देऊन पाहणी केली व उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनचे प्रकल्प संचालक वैभव गुप्ता, कुमारभाई पलन, लॉयन्स क्लबचे निर्मल अग्रवाल, अपूर्व अग्रवाल, स्टेशन प्रबंधक एच.ए.चौधरी, रेल्वे सुरक्षा दलाचे भोलानाथ सिंग, वाणिज्य निरिक्षक मुकेशकुमार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी यावेळी म्हणाले, रुग्णांची प्राथमिक तपासणी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येईल. रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास केटीएसमधून वातानुकूलीत रुग्णवाहिकेतून लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये रुग्णास आणण्यात येईल. रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकाची भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीराच्या भागाची, कानाच्या रुग्णांवर तसेच १४ वर्षाच्या आतील पोलिओ रुण्गांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. तर दातांचे विकार, मिर्गी (फिट) व स्त्रीरोगावर उपचार करण्यात येतील.
दिल्ली येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थान (एम्स) व मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयाचे तसेच पुणे, लखनौ येथील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील. रुग्णांवरील शस्त्रक्रिया सकाळी ९ ते १० या वेळेत करण्यात येतील असेही डॉ.सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
डॉ.धकाते माहिती देतांना म्हणाले की, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांसाठी वेगळा कक्ष उभारण्यात येईल. दोन वार्ड सुसज्ज व वातानुकूलीन तयार करण्यात येतील. रुग्णांची प्राथमिक तपासणी केटीएसमध्ये केल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये आणण्यात येईल. रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येईल. ग्रामीण भागातील रुग्णांना लाईफ लाईनच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी आशा वर्करमार्फत माहिती घरोघरी पोहचविण्यात येत आहे.
इम्पॅक्ट इंडियाचे प्रकल्प संचालक वैभव गुप्ता यांनी सांगितले की, लाईफ लाईन एक्सप्रेसच्या सेवेला ३१ वर्ष पूर्ण झाली आहे. बिहार राज्यातील कलहारी येथून या एक्सप्रेसने आरोग्य सेवेची सुरुवात केली. गोंदिया येथे ४ ते २५ मे दरम्यान होणारे हे या एक्सप्रेसचे १७२ वे शिबीर आहे. सुरुवातीला या एक्सप्रेसला तीन डब्बे होते. ही संख्या वाढून आता पाच झाली आहे. १९ राज्यात या एक्सप्रेसने प्रवास करुन रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. दोन डब्ब्यांमध्ये ऑपरेशन थिएटर असून एका डब्ब्यामध्ये तीन ऑपरेशन टेबल व दुसऱ्या डब्ब्यांमध्ये २ ऑपरेशन टेबल आहे. शस्त्रक्रियेपूर्वी बधीरीकरणासाठी लागणारी मशीन, पाच मायक्रोस्कोप, एक भोजनयान, एका डब्ब्यामध्ये प्रशासन कक्ष, एकामध्ये परिषद कक्ष व दंत शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वीत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचेसह उपस्थित अधिकारी, सेवाभावी संस्था प्रतिनिधी व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी लाईफ लाईन एक्सप्रेसची पाहणी करुन शस्त्रक्रियेसाठी असलेल्या यंत्रसामुग्रीची माहिती जाणून घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.