झाडासोबत घ्या सेल्फी व्याघ्र प्रकल्पात मिळवा फ्री एन्ट्री

0
16

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकाराम महाराजांनी सांगून
वृक्षांवर प्रेम करण्याची शिकवण आपल्या साऱ्यांना दिली. त्यांनी
वृक्षांना सगेसोयरे मानलं पण त्याच सग्या सोयऱ्यांकडे आपण दुर्लक्ष
केल्याने आज पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात
होत असलेली वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, कारखाने आणि वाहनांचे प्रदूषण,
सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाचे आव्हान या सर्वांच्या एकत्रित परिणामातून
वातावरणाचे तापमान वाढत आहे, त्याचे परिणाम हे कधी दुष्काळ तर कधी
अतिवृष्टीच्या स्वरूपात आता आपल्याला जाणवत आहेत. जैव विविधतेची संपन्नता
अडचणीत येत आहे. अनेक दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.
पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड हे
एक महत्वाचे पाऊल आहे. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे “वना”त आहे.
ज्याच्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दृष्टीआड सृष्टी असं म्हणून
आता चालणार नाही तर जागरूकदृष्टीने या “वनसृष्टी”कडे बघण्याची वेळ आली
आहे.

वनांच्या ऱ्हासामुळे दरवर्षी बहुमोल माती वाहून जात आहे. जमीनीची धूप
वाढत आहे.  ही वनसृष्टी जपायची असेल तर वनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन
प्रथम बदलणे आवश्यक आहे. भक्षक न होता वनांचा रक्षक होण्याची गरज आहे. हे
एकट्या शासनाचे काम नाही. लोकसहभागातून या कामाची यशस्वीता अधिक ठळकपणे
उठून दिसणार आहे. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली
वन विभागाने पुढाकार घेऊन पहिले पाऊल टाकले आहे. येत्या १ जुलै २०१६ रोजी
राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य वन विभागाने ठरवले आहे.यात वन
विभागासह शासनाचे २२ विभाग सहभागी होणार असले तरी लोकसहभागाशिवाय हा
कार्यक्रम यशस्वी होणार नाही हे लक्षात घेऊन लोकसहभाग वाढवणारे अनेक
उपक्रम विभागाने हाती घेतले आहेत.

ग्रीन पंढरपूरसारखी संकल्पना वन विभाग राबवित आहे. तिथे तुळशी उद्यानाची
निर्मिती करण्यात येत आहे. नक्षत्र वन, बांबू वन, सुगंधी वनस्पतींचे
उद्यान, स्मृति वन यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पना वन विभागाने हाती
घेतल्या आहेत.  घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या ज्योर्तिलिंगाच्या ठिकाणी
‘महादेव वन’ उभारले जात असून येथे बेल तसेच रुद्राक्षाची झाडं लावण्यात
येत आहेत.

खाजगी-पडिक, सार्वजनिक आणि वनेतर जागेवर वृक्ष लागवडीची संकल्पना लोकमनात
रुजवली जात आहे. वृक्ष लागवडीचा उपक्रम केवळ शासकीय पातळीवर न राहता ती
एक लोकचळवळ व्हावी यासाठी वन विभागाने अतिशय नियोजनबद्ध पाऊल उचलली आहेत.
प्रत्येक तालुक्यात या कामासाठी समन्वय अधिकारी नेमला आहे. जिल्हा आणि
राज्यपातळीवरील समित्याची स्थापना करून या कामाला गती देण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, हरित सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी
संस्था, विविध उद्योगांच्या आस्थापना, संघटना, रोटरी-लायन्स क्लबचे
पदाधिकारी, शहरातील मान्यवर व्यक्ती, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पक्षीय
भेद न मानता स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांनाच या कार्यक्रमात सहभागी
होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापक जनजागृतीसाठी शालेय
विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, निबंध
स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. पथनाट्याद्वारे लोकांपर्यंत वनांचे
आणि झाडांचे महत्व पोहोचवले जात आहे. पाऊस आणि झाडांचा परस्पर संबंध
पटवून दिला जात आहे. गडचिरोली-सिंधुदूर्ग सारख्या ठिकाणी जिथे
वृक्षाच्छादन जास्त आहे, तिथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे पण
मराठवाड्यासारख्या भागात वृक्षाच्छादन कमी असल्याने तिथे सातत्याने
पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे हे लोकांना समजून सांगितले जात आहे.
लातूरसारख्या ठिकाणी फक्त .०७ टक्के वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागातील
वनक्षेत्र वाढवण्याला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्राधान्य दिलं
आहे. यासाठी मराठवाड्यात उत्तम रोपवाटिका तयार करा, त्यासाठी लागणारा
सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल ही ग्वाही देतांना त्यांनी वृक्ष
जगवण्यासाठी सर्वच विभागांनी तसेच नागरिकांनी जागरुकतेने काम करावं हे
देखील सांगितले आहे. १००० रोपं लावली तर त्यातील ७० टक्के रोपं जगतात हे
प्रमाण कसे वाढवता येईल याची तयारी करतांना ट्री गार्ड, रोपांना कुंपण
सारख्या योजना अंमलात आणल्या जाणार आहेत.

लोकसहभाग वाढवतांना नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यात येत आहेत. जसे की
शाळेचे पहिले पाऊल- वृक्ष लावून सारखी कल्पना बीड मध्ये राबविण्यात येत
आहे तर सेल्फी विथ ट्री सारखी कल्पना राज्यस्तरावर राबविण्याबाबत वन
विभागाने सुचविले आहे. यामध्ये लावलेल्या झाडासोबत आपला फोटो काढून
नागरिकांनी तो वन विभागाच्या संकेतस्थळावर लोड करावयाचा आहे. पाठवलेल्या
सेल्फींमधून लकी ड्रॉ काढून त्यात निवडल्या गेलेल्या मान्यवरांना
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात फिरण्यासाठी द्यावी लागणारी एन्ट्री फी
माफ करण्यात आली आहे. म्हणजे त्यांना ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट,
सह्याद्री, नवेगाव-नागझिरा आणि बोर  या सहा व्याघ्र प्रकल्पात विना
प्रवेश शुल्क पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. २१ जून २०१६ रोजी जागतिक
योग दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत आहे.
याठिकाणी वन विभागाचे कर्मचारी जाऊन गावकऱ्यांना  वृक्ष लागवडीचे महत्व
सांगणार आहेत शिवाय त्या गावातील वृक्ष लागवडीचे नियोजनही त्या सभेत
निश्चित करण्यात येणार आहे. काही जिल्ह्यात पथनाट्य, वृक्ष दिंडी सारख्या
कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. काही गावांनी तर स्वत: पुढाकार घेऊन गावातील
मोकळ्या जागांवर न केवळ वृक्ष लागवडीचा संकल्प केला परंतू ते वृक्ष
जगविण्याची हमी दिली आहे. जलयुक्त शिवारची राज्यात जी कामे झाली त्याच्या
दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. एकूणच वृक्ष
लावायचा आणि दुष्काळ हटवायचा या निर्धाराने शासनाच्या संकल्पनासोबत
राज्यातील जनता सज्ज झाली आहे.                                                          डॉ. सुरेखा म. मुळे