पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज – विभागीय आयुक्त

0
12

नागपूर : यंदा मान्सून दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले आहे. अशावेळी उद्भवणाऱ्या पूरप्रवण परिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी विभाग सुसज्ज असल्याचे मत विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी मंगळवारी व्यक्त केले.

विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सभा कक्षात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व तयारीबाबत समन्वय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी श्री.कुमार बोलत होते.

यावेळी कर्नल गगनदीप सिंग, लेफ्टनंट कर्नल जे. एस. घुमन, गार्ड रेजिमेंटल सेंटर, कामठी, वायुसेना, लष्कर दलातील मुख्य अधिकारी, पोलीस दलाचे अधिकारी, होमगार्ड, सिंचन विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मनपा अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, प्रदीपकुमार डांगे, तहसिलदार प्रशांत पाटील, श्रीराम मुंधडा, विभागीय नियंत्रण कक्षाचे गोपाल इटनकर, सचिन शिंदे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

या समन्वय बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट, रबर बोट, सर्च लाईट, मेगा फोन, तंबू, दोर, विजेरी, होंडा पंप, ईलेक्ट्रिक जनरेटर, फायर सूट, फोल्डिंग स्ट्रेचर, प्रथम उपचार पेटी इत्यादी अत्यावश्यक साधने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात साथीचे आजार झपाट्याने वाढतात. त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. पावसाळ्यामध्ये वीज कोसळून घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून स्वयंसेवक, एनजीओ अशा सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, असे आवाहनही अनूप कुमार यांनी यावेळी केले.