वाघनदी -वैनगंगेच्या कुशीत 82 सारसांचे विचरण

0
24

गोंदिया जिल्हयात आढळले ३५ सारस 1c44c4b3-7df1-4162-82f1-222571f25f7d
खेमेंद्र कटरे
गोंदिया दि.१६ :- निसर्गाच्या कुशीत वसलेला जलसंपन्न असलेला तलावांचा आणि धानांचा जिल्हा म्हणून गोंदिया,भंडारा व बालाघाटची ओळख आहे.त्यातच वैनगंगा आणि वाघनदीच्या किनारपट्टीला लागून असलेल्या शेजारील बालाघाट जिल्ह्याच्या भागासह गोंदिया-भंडारा जिल्हयात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळे असून जिल्हयात असलेल्या माजी मालगुजारी तलावावर विविध प्रजातीचे स्थलांतर करुन विदेशी पक्षी जिल्हयात दाखल होतात. सारस हा पक्षी म्हणजे गोंदिया जिल्हयाचेच नव्हे तर बालाघाटचेही वैभव होऊ लागले आहे.एकीकडे राज्यात केवळ गोंदिया जिल्हयातच सारस पक्षांचे अस्तित्व आहे.तर शेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातही सारसचे अस्तित्व नुकत्याच करण्यात आलेल्या सारस गनणेतून समोर आले आहे.गोंदिया जिल्हयात ३५ सारस पक्षी असल्याची सारस गणनेदरम्यांन खात्री करण्यात आली. भंडारा जिल्हयात दोन तर शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हयात ४५ सारस पक्षी गणनेतून दिसून आले.
सारस हा स्थानिक पक्षी असून मोठा, उंच व रुबाबदार असलेला सारस ऐश्वर्यसंपन्न आहे. या पक्षाला बघण्यासाठी अनेक पर्यटकांची पाऊले आता जिल्हयातील माजी मालगुजारी तलावांच्या काठाकडे वळली आहेत. विशेषत: परसवाडा, झिलमिली, नवेगावबांध, झालिया, बाघ नदीचा किनारा यासह अन्य तलावांच्या काठावर सारस पक्षी आढळून येतात.
वन्यजीव व पक्षीप्रेमी असलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सारसाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सारस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सारस प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जातो. हा पक्षी आपल्या जोडीदाराची एकदा निवड केल्यानंतर तो अखेरच्या श्वासापर्यंत सोबत असतो. जर एकाचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या‍ विरहान अन्न त्याग करुन दुसराही आपले प्राण त्यागतो. असे म्हणतात. सारस महोत्सवाच्या माध्यमातून अनेक पक्षी प्रेमी सारस बघायला जिल्हयात आले. यामध्ये सर्वाच्च न्यायालयाचे न्या. श्री बोबडे, संगीतकार मिलींद, सुप्रसिध्द मराठी अभिनेते डॉ. गिरीष ओक यांचेसह अनेकांनी सारस पक्षी बघितले.6367eea5-0dda-4f37-8a26-bf9a6bc35493
जिल्हयात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्षांचा अधिवास असून या पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. सारस महोत्सवात सारसाचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सारसमित्र म्हणून सन्मान करण्यात आला. या सारस मित्रांना सारस संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक ते साहित्य वितरीत करण्यात आले .
सारसांची नेमकी संख्या जिल्हयात किती असेल या दृष्टीने नुकतीच चार दिवस सारस पक्षांची गणना करण्यात आली. मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार तसेच सारस संरक्षण प्रकल्प प्रभारी विश्वदयाल गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली ही सारस गणना पारंपारीक तसेच शास्त्रीय पध्दतीने करण्यात आली. यामध्ये जवळपास ५० निसर्गप्रेमीनी सहभाग घेतला. १२, १३ आणि १४ जून या कालावधीत गोंदिया आणि भंडारा जिल्हयातील एकूण ५० ठिकाणी १७ चमूतील जवळपास ५० ते ५५ निसर्गमित्रांनी सारस गणना केली.
सेवासंस्थेच्या सदस्यांच्या वतीने पूर्ण वर्षभर सारसांचा अधिवास त्यांचे प्रजनन, खाद्यांसाठीचा भ्रमणमार्ग याचा अभ्यास करण्यात येतो. तसेच ज्या शेताच्या परिसरात सारस आढळतात त्या शेतकऱ्यांचे सुध्दा प्रबोधन करुन सारसांचे महत्व पटवून देण्यात येते. शेतात किटकनाशकांचा वापर त्या शेतकऱ्यांनी करु नये यासाठी आग्रह धरण्यात येतो. सेवा ही संस्था मागील १३ वर्षापासून सारस संरक्षणाच्या कामात जूळली आहे.सारस गणना गोंदिया निसर्ग मंडळ नागझिरा फाऊंडेशन जिल्हा प्रशासन, वनविभाग तसेच वन्यजीव विभाग यांच्या सहकार्यातून, सक्रीय योगदानातून करण्यात आली.