शाळा प्रवेशोत्सव शिक्षणासाठी पलखेडा ग्रामस्थ अर्थतज्ञ – डॉ.विजय सूर्यवंशी

0
27

पलखेड्यात नवागतांचे स्वागत
गोंदिया,दि.२८ : पलखेडासारख्या आदिवासी बहुल गावातील प्राथमिक शाळेला जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा होण्याचा मान मिळाला आहे. डिजीटल शाळेसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा केली. यावरुन त्यांना शिक्षणाचे महत्व कळले आहे हे दिसून येते. नेमकी कुठे गुंतवणूक करावी हे त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे. शिक्षणासाठी केलेल्या गुंतवणुकीवरुन पलखेडा ग्रामस्थ खऱ्या अर्थाने अर्थतज्ञच असल्याचे दिसून येते. असे गौरोदगार जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काढले.
२७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवानिमित्त गोरेगाव तालुक्यातील पलखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सव स्वागत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, सरपंच चंद्रकला सयाम, उपसरपंच श्री.बिसेन, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष हेमराज सयाम यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या श्रीमती सूर्यवंशी,सीईओच्या श्रीमती पुलकुंडवार, श्रीमती नरड यां प्रामुख्याने उपस्थित होते.
311f53ae-2a8a-40ed-aeb3-0de2aa53d152 डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, पलखेडा शाळेपासून अनेक शाळांनी डिजीटल शाळा करण्याची प्रेरणा घेतली आहे. आपल्या गावातील मुले शिक्षण घेऊन चांगल्या मोठ्या पदावर गेली पाहिजे यासाठी त्यांना प्राथमिक शाळेत कोणकोणत्या सुविधा आपल्याकडून देता येईल यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांनी मदत केली आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानदान करणाऱ्या या शाळेची आवारभिंत येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून डिजीटल शाळांसाठी सॉफ्टवेअर खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. जिल्ह्यात लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या डिजीटल शाळांवरुन हे दिसून येते. गाव हा आपला परिवार आहे हे मानून शिक्षक काम करतांना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या टॅबचा वापर अभ्यासासाठी करुन जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करावे. जिल्ह्यातील सर्व शाळा नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून डिजीटल करण्यात येणार आहे. यासाठी पालकमंत्री सुध्दा आग्रही आहे. देशाची ही भावी पिढी चांगली घडली पाहिजे यासाठी पलखेडाच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन यशाची शिखरे गाठावीत अशा शुभेच्छाही दिल्या.
श्री.नरड म्हणाले, शिक्षणासाठी गोंदिया जिल्हा हा राज्यात रोल मॉडेल ठरत आहे. जिल्ह्यात डिजीटल शाळा व इतर उपक्रमांसाठी ३ कोटी रुपये लोकसहभागातून जमा करण्यात आले आहे. मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या हात धुवा या अभियानानंतर किशोरवयीन मुलींसाठी प्रबोधनाचा कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खाऊ, पुस्तके, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. चवथीच्या विद्यार्थ्यांना ९ टॅबचे वितरण करण्यात आले. शाळेच्या विकासासाठी ५० हजार रुपये देणगी दिलेल्या डॉ.नरेंद्रकुमार बहेकार यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी श्रीराम बहेकार यांनी शाळेच्या विकासासाठी १० हजार रुपये रक्कम देणगी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांची रांगोळी काढणाऱ्या श्री.मंडल या शिक्षकाचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पलखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख रघुपती अगडे यांनी केले. संचालन शिक्षक युवराज माने यांनी केले, उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका कुसुम भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सचिव के.बी.ठाकरे यांनी परिश्रम घेतले.