डिजिटल क्रांतीमधील नव्या कल्पनांचे राज्य शासनाकडून स्वागत- मुख्यमंत्री

0
16

मुंबई, दि. 28 : डिजिटल क्रांतीमुळे लोकांचे जीवन बदलून गेले
आहे. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातही या क्रांतीने आमुलाग्र बदल केला आहे.
‘आपले सरकार’ सारख्या उपक्रमांद्वारे महाराष्ट्र शासन या डिजिटल
क्रांतीमध्ये सहभागी होत आहे. लोकांपर्यंत पोहचणाऱ्या व त्यांच्या
उपयोगाच्या नवनव्या कल्पनांचा राज्य शासन अंगिकार करेल. या बदलात अॅमेझॉन
वेब सर्व्हिस कंपनीने राज्य शासनासोबत सहभागी व्हावे, असे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन मैदानात सुरू असलेल्या
ॲमेझॉन वेब सर्व्हिस परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी
ॲमेझॉन वेब सर्व्हिसच्या विपणन विभागाचे जागतिक उपाध्यक्ष माईक क्लेव्हर,
मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेस्सी, भारतातील प्रमुख विक्रम बेदी आदी
यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ॲमेझॉन वेब सर्व्हिसने
सुरू केलेल्या पेमेंट गेटवे, व्हर्च्युअल रियलिटी स्टार्टअप,
स्ट्रान्सफार्म रियल इस्टेट एजन्सी आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे आरोग्य
रक्षण या सेवा महत्त्वपूर्ण आहेत. डिजिटल क्रांतीमुळे लोकांचे जीवनमान
बदलत आहे. आरोग्य क्षेत्रातील क्लाऊड कम्प्युटिंगच्या वापरामुळे या
क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी
पुण्यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. पुण्याला देशाचे स्टार्ट अप हब
करण्यात येत असून यासाठी ॲमेझॉनने राज्य शासनास सहकार्य करावे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजिटल इंडिया’ हा उपक्रम सुरू केला आहे. डिजिटल
कम्युनिकेशनद्वारे खेडी जोडणाऱ्या या उपक्रमामुळे देशाचा चेहरा बदलत आहे.
पूर्वी पालक आपल्या मुलांसाठी खासगी शाळांना प्राधान्य देत होते. मात्र,
या डिजिटल शिक्षणामुळे खेड्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांपर्यंत
माहितीचा स्त्रोत मोठ्या प्रमाणावर पोहचला असून त्यातून शिक्षण क्षेत्रात
मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. आज खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या
शाळांमध्ये प्रवेशासाठी पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण
मुलांच्या शिक्षणातील दरी कमी होत आहे, असेही फडणवीस यांनी
सांगितले.