तिबेटियन वसाहतीत दलाई लामांचा वाढदिवस साजरा

0
22

तिबेटीयन संस्कृतीचे घडले दर्शन

गोंदिया,दि.८ : तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते तथा बौध्द धर्मगुरु दलाई लामा यांचा ८१ वा वाढदिवस अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव जवळच्या नार्गेलिंग तिबेटियन वसाहतीत तिबेटियन बांधवांनी ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांच्या पारंपारीक कला संस्कृतीचे दर्शन घडले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वन सेवेचे अधिकारी परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहुल पाटील, तिबेटियन कॅम्पचे सेटलमेंट अधिकारी दोरजी रिनझीन, कॅम्प २३९ चे स्थानिक व्यवस्थापक छो गेनसीन, सरपंच कोम्बो दोरजी, पाल्गोन दोरजी, कालसंग छोडा, फिनसाँग वॉगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
केंद्रीय विद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बौध्दांचे आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तीनही तिबेटियन वसाहतीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी भारत-तिबेट मैत्री संघ यांचे सभासदही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व तिबेटियन नागरिकांनी पारंपारीक वेशभूषेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दलाई लामा यांच्या तैलचित्रासमोर वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम व गीत गायनातून दलाई लामा यांच्या दिर्घायुष्याची कामना करण्यात आली.