फडणवीसाच्या भ्रष्ट मंत्रीमंडळात आणखी पाच भ्रष्ट मंत्र्याची भरती – नवाब मलिक

0
17

मुंबई,दि.08 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यात कमी की काय म्हणून पाच आज आणखी भ्रष्ट मंत्र्याची भरती करण्यात आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात पाच भ्रष्टाचारी मंत्र्याना स्थान देण्यात आले असून त्यांच्यावर विविध घोटाळ्यांचे आरोप आहेत. यामध्ये जयकुमार रावल यांच्यावर सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांची 40 कोटी रुपयांच्या जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी चालू आहे, गुलाबराव पाटील यांच्यावर जमीन बळकाविणे, बोगस कागदपत्रांवर खोट्य़ा सह्यांच्या आधारे जमीन बळकावल्याच्या प्रकरणात त्यांना कोर्टाच्या आदेशाने अटक करण्यात आली होती. पांडूरंग फुंडकर यांच्यावर बँक घोटाळ्याचा आरोप आहे. रविंद्र चव्हाण यांच्यावर दलितांना डुक्कर म्हणून संबोधणे तसेच खंडणी वसूल करणे,अपहरण करणे, धमकी देणे आदी 12 गुन्ह्यांची नोंद आहे. एंकदरीतच गुंड आणि भ्रष्ट लोकांच्या संगनमताने हा मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.

फडणवीस सरकारच्या आधीच्या मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप आहे, गिरीष बापट यांच्यावर डाळ घोटाळा, विनोद तावडे अग्निशमन यंत्रे व फोटो खरेदी घोटाळा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलार पंप घोटाळा, रविंद्र वायकर यांचा एसआरए घोटाळा, विष्णू सावरा आदीवासी विद्यार्थ्यांसाठीचा साहित्य घोटाळा, दिवाकर रावते यांचा एस्टी महामंडळ घोटाळा, गिरीष महाजन यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप आहे. बबनराव लोणीकर यांच्यावर बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप आहे, रणजीत पाटील यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप आहे. अशा एकूण दहा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. आता त्यामध्ये पाच जणांची भरती करण्यात आल्याने  फडणवीस सरकार हे भ्रष्टाचाराला राजाश्रय मिळवून देत असल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.