‘सभापती साहेब, गुरूजी देताय का गुरूजी…!‘

0
15

मेहताखेड्यातील आदिवासी विद्याथ्र्यांचा सवाल

सुरेश भदाडे
गोंदिया दि.2- ‘‘आदिवासी भागात असून बी आमी आपली शाळा जिल्ह्यात पईली आणली. आमच्या गावाजवळची दुसरी शाळा बी राज्यातील पईली डिजीटल शाळा ठरली. असे असताना जेव्हा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधायचा झाला, तेव्हा आमचा हक्क हिरावला गेला. आता तर आमच्या शाळेतील शिक्षकच कमी करून टाकले. साहेब आमी पुढे जात आहोत, कदाचित याचा राग तर तुम्हाला आला नसावा ना? मायबाप सभापती साहेब, तुमी काय बी करा, पर आमच्या आदिवासी भागात मास्तर तर धाडा. आमी पण शिक्षणात पुढे जाऊन आपल्या जिल्ह्याचा नाव रोषण करू मन्तो‘‘, असा आर्त सवाल मेहताखेडा येथील विद्याथ्र्यांसह देवरी तालुक्यातील ककोडी-मिसिपिर्री केंद्रातील आदिवासी विद्याथ्र्यांनी शिक्षण विभागाला केला आहे.
‘गावची शाळा, आमची शाळा‘ या प्रकल्पांतर्गत देवरी तालुक्याच्या आदिवासी भागातील मेहताखेडा ही शाळा जिल्ह्यात प्रथम आली. एवढेच नव्हे तर अतिदुर्गम भागातील जेठभावडा शाळा ही राज्यातील पहिली संगणकावर विद्याथ्र्यांना धडे देणारी पहिली डिजीटल शाळा ठरली. एकीकडे देवरी-सालेकसा सारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात सोईसुविधांचा अभाव असताना देखील आदिवासींची मुले शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत. या भागात कॉन्व्हेंट प्रथा नसताना सुद्धा ही मुले शहरी मुलांपेक्षा सरस ठरत आहेत. असे असताना आपसी राजकारण करण्यासाठी शिक्षकांच्या बदली प्रकरणात घोळ करण्यात आला. बदल्या रद्द झाल्या. पण देवरी-सालेकसा तालुक्यातील बदलीसाठी चातकाप्रमाणे वाट पाहणाèया शिक्षकांनी आदेश मिळताच नव्या ठिकाणी धूम ठोकली. पण ज्यांची नियुक्ती या आदिवासी भागात झाली, त्यांनी मात्र शिक्षण विभागाला हाताशी धरून नव्या ठिकाणी रुजू होण्याचे टाळले. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारे शिक्षकच कमी झाले. यावर कहर म्हणजे क्षमता नसताना आठवी-पाचवीचे आदेश लादले. मेहताखेडा शाळेची तर शिक्षणविभागाने पूर्ण वाताहत करून टाकली.
वर्ग सात, शिक्षक दोन. मुख्याध्यापकही तेच, टपाल नेणारेही तेच, खिचडी पाहणार तेच, सरल-प्रगतचे कामे ही पाहणारे तेच, निवडणुकीचे काम पाहणारे तेच, तर मग विद्याथ्र्यांना शिकविणार कोण? अशा सवाल आदिवासी विद्याथ्र्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे. शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी याकडे लक्ष देणार काय की आमच्या पाल्यांना असेच वाèयावर सोडणार, असा संतप्त सवाल देवरी तालुक्यातील पालकांनी शिक्षण विभागाला केला आहे.