अर्थमंत्री मुनगंटीवारांवर बेनामी संपत्तीचे अाराेप, तक्रार घेण्‍यास एसीबीचा नकार

0
10

नागपूर – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेनामी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कुटुंबियांची एसीबी चाैकशी करावी, अशी मागणी बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात तक्रार दिली मात्र एसीबीकडे त्यास नकार दिल्याचा अाराेपही त्यांनी केला.

मडावी आणि मूलचंदानी यांनी सांगितले की, मुनगंटीवार यांनी मागील निवडणूक लढविताना दिलेल्या आयकर विवरणातील तपशील पाहता तो त्यांनी सध्या बाळगलेल्या संपत्तीशी जुळताना दिसत नाही. १४ फेब्रुवारी रोजी मुनगंटीवार यांनी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नीला अलिशान फार्महाऊस भेट म्हणून दिले. यानिमित्त झालेल्या खास पार्टीवर सुमारे ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यात त्यांचे वडील सच्चिदानंद मुनगंटीवार व आतेभाऊ जयंत मामीडवार यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या सुमारे १७ एकर जागेवर हे फार्महाऊस उभारण्यात आले अाहे. १२ जुलैला एसीबीकडे तक्रार देण्यात आली. मात्र, ती तक्रार घेण्यात आली नाही, असा अाराेपही करण्यात अाला. मुनगंटीवार यांचे हे फार्महाऊस किमान २० कोटी रुपये खर्च झाला असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

मानहानीचा दावा ठोकणार : अर्थमंत्री
खोटे आरोप करणाऱ्यांवर आपण मानहानीचा दावा करणार असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कुठलीही कागदपत्रे दिलेली नाहीत. वडिलोपार्जीत जमिन विकून आम्ही ते फार्महाऊस उभारले आहे. त्यावर झालेल्या खर्चाचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. राजकीय भावनेतून आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.