गडचिरोलीच्या १० पोलिसांना पोलिस शौर्य पदक जाहीर

0
14

गडचिरोली, दि.१४: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज शासनाने दुर्गम भागात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० जिगरबाज पोलिसांना पोलिस शौर्य पदक जाहीर केले आहे. एका सहायक फौजदारास गुण्वत्ता पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक अतुल श्रावण तावाडे, पोलिस शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, शिपाई प्रवीण हंसराज भसारकर, शिपाई बाबूराव महारु पदा, शिपाई विनोद मेस्सो हिचामी, हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, शिपाई दिलीप ऋषी पोरेटी, शिपाई दिनकरशहा बालसिंग कोरेटी, शिपाई देवनाथ खुशाल काटेंगे व शिपाई संजय लेंगाजी उसेंडी अशी पोलिस शौर्यपदक जाहीर झालेल्या जवानांची नावे आहेत. सहायक फौजदार अनिल मधुकरराव दांगट हे गुणवत्ता पदकाचे मानकरी ठरले आहेत. १७ ऑक्टोबर २०१३ रोजी एटापल्ली तालुक्यातील कसूरवाही, पेंदूलवाही, गोटीनवडा जंगलात नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन नक्षल्यांना पिटाळून लावले. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता, तर पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक, काडतुसे व इतर साहित्य जप्त केले होते. या शौर्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अतुल श्रावण तावाडे, पोलिस शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, शिपाई प्रवीण हंसराज भसारकर, शिपाई बाबूराव महारु पदा, शिपाई विनोद मेस्सो हिचामी यांना शौयपदक जाहीर झाले आहे.
१२ ऑगस्ट २०१४ रोजी खोब्रामेंढा जंगलात नक्षल्यांशी चकमक झाली होती. यावेळीही जवानांनी नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवाद्यांना जंगलात पळ काढावा लागला होता. तेथे पोलिसांनी दोन नक्षल्यांचा खात्मा करुन एक रायफल व अन्य साहित्य ताब्यात घेतले होते. यासाठी हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, शिपाई दिलीप ऋषी पोरेटी, शिपाई दिनकरशहा बालसिंग कोरेटी, शिपाई देवनाथ खुशाल काटेंगे व शिपाई संजय लेंगाजी उसेंडी यांना शौर्यपदक जाहीर झाले आहे. शिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत सहायक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांनी पोलिस विभागाला दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेकरिता त्यांना पीएमएमएस हे पदक मंजूर करण्यात आले आहे.