शेळीपालनासाठी माविमची जनजागृती रॅली

0
22

गोंदिया,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब कुटुंबियांच्या उपजिविका वाढविणावर व निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. माविमच्या माध्यमातून तालुक्यातील ३७ गावात शेळीपालन उपजिविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत समुदाय पशुधन व्यवस्थापक व पशुसखींच्या माध्यमातून गरीब शेळीपालकांना कमीत कमी किमतीत चांगल्या प्राथमिक उपचार सुविधा मिळाव्या याकरीता ३७ पशुसखी व ४ समुदाय पशुधन व्यवस्थापक यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.
सालेकसा तालुक्यातील गरीब कुटुंबियांची उपजिविका मोठ्या प्रमाणात शेळीपालनावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त नागरिकांना शेळीपालनाविषयी माहिती व्हावी, त्यांचे लसीकरण, डी बर्निंग याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून समुदाय साधन व्यक्तीच्या माध्यमातून बचतगटातील महिला, पशुसखी व गावातील नागरिक यांच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात शेळीपालनावर जनजागृती रॅली काढण्यात आली. या सर्व गावांमध्ये स्वयंसहायता महिला बचतगटातील सदस्य व गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीदरम्यान शेळीपालन व्यवसायबाबत बकरी गरीब की गाय है, घर मे पाणी पिलाव बिमारी भगाव, दानामिश्रण खिलाव समय बचाव, बधियाकरण कराव बकरेका बजन बढाव, टिकाकरण कराव बिमारी भगाव, बिमा कराव बिमारी भगाव अशा घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीच्या आयोजनाकरीता माविमचे तालुका व्यवस्थापक अनिल गायकवाड, उपजिविका विकास सल्लागार हंसराज रहांगडाले, समुदाय संघटक संगीता मस्के, शालू साखरे, प्रशांत बारेवार, सहयोगीनी उषा पटले, नयना कटरे, कामेश्वरी गोंडाणे, छाया मोटघरे, अर्चना कटरे, सुशीला बघेले, दुर्गा देशमुख, लेखापाल मुकेश भुजाडे आदी यावेळी उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय पशुधन व्यवस्थापक मेहाचंद ठेकवार, झनकलाल तुरकर, चमरु लिल्हारे, संतोष तुमसरे, देवेंद्र शहारे, पन्नालाल पटले व गावातील पशुसखी, समुदाय साधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.