वंचितांना न्याय देण्यासाठी शासन सदैव कार्यरत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
16

आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे उद्यान नामकरण

नागपूर, दि 20 : महाराष्ट्र शासन मातंग समाजाच्या विकासासाठी कटिबध्द
आहे. दलित वस्ती सुधार योजना बदलून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती सुधार
योजना सुरु केली असून दलित व वंचितांकरिता हे राज्य सदैव कार्यरत राहील
असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर येथील महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी उद्यानात आयोजित आद्य
क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस
यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ट वाहतूक
मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर
प्रविण दटके, आमदार सर्वश्री मिलिंद माने, सुधाकर देशमुख, अनिल सोले,
तसेच दयाशंकर तिवारी, संदीप जाधव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 13 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर महापालिकेने या
उद्यानारचे आद्य क्रांतीगुरु लहूजी साळवे उद्यान असे नामकरण केले. लहुजी
साळवेंचा सुंदर पुर्णाकृती पुतळा बसविला, त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन
केले. लहुजी साळवे हे शूर लढवय्ये होते. त्यांचे संपूर्ण घराणे
स्वराज्याच्या स्थापनेत लढणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात
शूर सैनिक म्हणून भाग घेतला. शिवाजी महाराजांनी पुरस्कृतही केले होते.
हिंदवी स्वराज्याच्या लढाईत इंग्रजांविरुध्द प्राणपणाने ते लढले. इंग्रज
सैनिकही त्यांच्या चपळाई पाहून अवाक व्हायचे.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वाभिमानाने जगायचे तर अगोदर व्यायाम आवश्यक
आहे म्हणून पुण्यात पहिली तालिम लहुजींनी सुरु केली. क्रांतीगुरु म्हणून
लहुजी साळवे सुपरिचित होते. शस्त्रास्त्र व तालिमिचे धडे तरुणांना
त्यांनी दिले. महात्मा फुले यांच्या शिक्षण कार्यात सक्रीय सहभाग म्हणून
लहुजींनी पहिल्यांदा आपली कन्या शाळेत पाठविली. महात्मा फुलेंना
सर्वप्रथम संरक्षण लहुजी साळवे यांनी दिले. स्वातंत्र्याच्या लढ्यात
साळवेंचे योगदान मोठे होते. त्यांची प्रेरणा आपणास सदैव मिळत राहील.
प्रत्येकास स्वातंत्र्याचे मोल समजावे म्हणून महापालिकेने लहुजी साळवेंचा
पुतळा उभारुन उत्कृष्ट कार्य केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले
की, आपणास स्वराज्य मिळाले आहे, आता प्रत्येकाने सुराज्याकडे वाटचाल
करण्यासाठी संकल्प करावा.

राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, एकोणिसाव्या शतकातील एक
महाराष्ट्रीय क्रातिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक, लहुजी वस्ताद
या नांवानीही ते परिचित होते. त्यांचे घराणे राऊत या नांवाने ख्यातनाम
होते. त्यांचे घराणे धाडसी व देशभक्त परिवार म्हणून ओळखले जात. युवक
युवतींनी स्वावलंबी होण्यासाठी महामंडळाचे कर्ज घेऊन सन्मानाने जीवन
जगावे. शासनातर्फे नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार असून त्यामध्ये
मातंग समाजांनाही घरे उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी महापौर प्रविण
दटके यांनी आपल्या भाषणात लहुजी यांच्या कार्याचा आढावा घेतला.