गोंदिया रेल्वे स्थानकात मेडिकल व्हॅन

0
12

berartimes.com गोंदिया दि.7-: वाढत्या रेल्वे ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सची दुरूस्ती व देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाद्वारे सतत काम केले जात आहे. अपघातांमुळे वेळोवेळी जीवित व वित्तहानीच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. या कार्यांना योग्य रूप देण्यासाठी आधुनिक यंत्रांची गरज म्हणून गोंदिया स्थानकात सेल्फ प्रोपेल्ड अँक्सिडेंट रिलिफ ट्रेन (एसपीएआरटी) उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिला अपघात रिलिफ मेडीकल व्हॅनसुद्धा म्हटले जाते.
सततचे वाढते रेल्वे ट्राफीक व मोठय़ा ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सच्या दुरूस्तीसाठी प्रशासन सतत काम करीत आहे. तसेच ब्रेकडाऊनमुळे रेल्वे परिचालन बाधित झाल्यास प्रशासनाद्वारे सतत प्रयत्न करून ती अडचण दूर केली जाते. मात्र अनपेक्षित अपघाताच्या वेळी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सदर अपघात रिलिफ ट्रेन (मेडिकल व्हॅन) उपलब्ध राहणार आहे.
सदर व्हॅनमध्ये जखमी प्रवाशांच्या देखभालीसाठी एक लहान ऑपरेशन थिएटर आहे. त्यात प्राथमिक उपचार व छोटे ऑपरेशन केले जाऊ शकतात. या व्हॅनमध्ये आवश्यक औषधी व जवळपास १२ प्रवाशांसाठी बेडची व्यवस्था आहे. अपघातादरम्यान एक डॉक्टर व एक सहायक उपस्थित राहतात. ते पीडितांच्या आवश्यकतेनुसार उपचार करतात.
वेळोवेळी उपलब्ध अपघात रिलीफ उपकरणांची तपासणी मंडळाच्या उच्च अधिकार्‍यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हॅन अपडेट राहण्यास मदत होते. मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी गोंदिया स्थानकात उपलब्ध सदर ट्रेनचे निरीक्षक केले व कार्यप्रणालीची पाहणी केली.