शिवनी होणार जिल्ह्यातील पहिले ‘कॅशलेस’ गाव

0
16

भंडारा,दि.29 : भ्रष्टाचाराला थोपविण्यासाठी सरकारची वाटचाल सुरू आहे. या प्रक्रियेत आता ‘कॅशलेस’ व्यवहारावर भर देण्यात आले आहे. या अुनशंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारला लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) येथे जनजागृती मेळावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पहिले ‘कॅशलेस’ गाव म्हणून शिवनीची निवड केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या धनाच्या विरोधात मोहीम उघडत ५०० व १००० रूपयांच्या नोटांवर बंदी आणली. त्यानंतर सरकारने ‘कॅशलेस’ व्यवहारावर भर दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील धसई हे गाव देशातील पहिले ‘कॅशलेस’ गाव ठरले आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शासनाने ‘कॅशलेस’साठी पुढाकार घेतला असल्याने राज्यभरात यासाठी अधिकारीही सरसावले आहेत. मंगळवारला जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी शिवनी (मोगरा) भेट दिली. औचित्य होते, जनजागृती मेळाव्याचे. यावेळी त्यांनी सुरूवातीला गावात करण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या कामांची पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावाचा केलेल्या कायापालटची स्तुती केली.

यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, सरपंच माया कुथे, खंड विकास अधिकारी के. के. ब्राम्हणकर, सहायक खंड विकास अधिकारी मिलींद बडगे, विस्तार अधिकारी (पंचायत) धनश्याम चकोले, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, सचिव जयंत गडपायले उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांना ‘कॅशलेस’ व्यवहाराची उपयुक्तता व फायदे सांगितले. प्रगत शिवनी येथील नागरिक उपजिवेसाठी दैनंदिनी रोखीने व्यवहार करतात. ते यानंतर डेबीट कॉर्ड व स्वाईप मशिनच्या माध्यमातून करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून ग्रामस्थांना विचारना केली असता त्यांनीही ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याला होकार दिला. त्यामुळे हा व्यवहार होण्याच्या दृष्टिने आता ग्रामस्थांना यंत्रणांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २६ जानेवारीपर्यंत ‘कॅशलेस’ प्रणाली गावात लागावी यासाठी आता शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जनजागृगती कार्यक्रमाला गट संसाधन केंद्राच्या नमिशा ब्राम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भिमराव खांडेकर, तलाठी डांबरे, पोलीस पाटील रोहिदास कुनभरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.